कृषी

Dr. Amol Kolhe : केंद्र, राज्यातील सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन

Pune News : ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा विमा कंपन्यांचेच उखळ पांढरे झाले आहे. आपल्या भागामध्ये शेतकरी ऊस शेती लावतो, कांदा लावतो, डाळिंब लावतो, परंतु सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी उभारीच घेत नाही. परंतु केंद्र व राज्य सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन आले आहेत,’’ अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने भिगवण (ता. इंदापूर) येथील दुर्गामाता मंदिरामध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.या वेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, अॅड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, अप्पासाहेब पवार, दादासाहेब थोरात, अशोक घोगरे, विजयकुमार गायकवाड आदी उपस्थित होते. दादासाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले.

खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकरी सन्मान योजनेचा मोठा गवगवा करते, या योजनेतून शेतकऱ्यांना केवळ दिवसाला १७ रुपये देते, तेही नियमित नाही. खतांवर कर लावून शेतकऱ्यांच्या खिशातून हजारो रुपये काढून घेते व शेतकऱ्यांना प्रतिदिन १७ रुपये देऊन शासन शेतकऱ्यांचा सन्मान करते की अपमान, हे ठरविण्याची वेळ आली आहे.

सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छाच नाही. दुधाचे अनुदान देत असताना केवळ खासगी संघाना बाजूला ठेवत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. सरसकट दूध उत्पादकांना अनुदान दिले पाहिजे.’’

दरम्यान, शेतकरी आक्रोश मोर्चाचे इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण येथे स्वागत केले. भिगवण गावामधून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी आक्रोश मोर्चासाठी इंदापूर व दौंड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *