Post Monsoon Crop Damage : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही.
Nashik News : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही. मात्र त्यातील पर्याय यासह भविष्यातील संधी ओळखून कामकाज केल्यास त्यातील धोके कमी करता येतील. शास्त्रीय पद्धतीने कामकाज महत्त्वपूर्ण ठरेल.
त्यातूनच द्राक्षशेतीची भविष्यकालीन वाटचाल महत्त्वाची राहील, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्फत पंचवार्षिक पुनरवलोकन संघ यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांसाठी धोरण व भविष्यकालीन योजना यांचा आढावा घेतला जातो. या धर्तीवर ही समिती जिल्हा दौऱ्यावर आली होती.
यावेळी समितीचे प्रमुख निवृत्त शास्त्रज्ञ व समितीचे प्रमुख डॉ.पार्थ सारथी, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. डॉ. कौशिक बॅनर्जी, प्लांट पॅथॉलॉजिस्ट. सुजय साहा, माजी अतिरिक्त महासंचालक, फलोत्पादन विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे डॉ. बी.के. पांडे, तामिळनाडू कृषी विद्यापीठ डॉ. राजंगम, प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रकल्प समन्वयक (फळे), भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था. प्रकाश पाटील आदींचा या समितीत समावेश होता. तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यांना भेटी देऊन कामाचा अनुभव घेतला.
नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रगतीशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरुण मोरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘द्राक्षबागांची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजना’ याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
रविवारी (ता. २६) झालेल्या गारपिटीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करून बागेतील संभाव्य रोग नियंत्रण करण्यासाठी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना व सल्ला शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्याची माहिती डॉ. बॅनर्जी यांनी दिली.