कृषी

इच्छाशक्ती असावी तर अशी! खडकाळ माळरानावर शेतकऱ्यानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती, शेतीत केला नवा प्रयोग

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील शेतकरी (Farmer) सातत्याने दुष्काळ, अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी नवीन पिकांचा अवलंब करतात. असे वेगळी वाट निवडणारे व नवीन पीक पद्धती शोधून भरपूर आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

असाच एक अनोखा प्रयोग दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केला आहे. कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील आकाश अशोक ढेरे (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देत माळरानावर स्ट्रॉबेरी (Strawberry Farm) फळाची लागवड केली आहे. कुची येथे त्यांचा हा प्रयोग या भागात यशस्वी झाला आहे. ढेरे यांचा स्ट्रॉबेरी घेण्याचा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. त्यांचे कुटुंबीय शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात.

ढेरे कुटुंबीयांना द्राक्ष, पेरू व ऊस या पिकांतून म्हणावा तसा लाभ मिळाला नाही. शेतीत काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छाशक्ती असल्याने त्यांनी स्ट्रॉबेरीचा विचार केला. आकाश ढेरे यांची स्ट्रॉबेरी फळाची सुरवात आहे. त्यांनी ऑक्टोबरमध्ये लागण केली. सुरवातीला तीन गुंठे जमिनीवर लागण केली. त्यामध्ये सुमारे एक हजार रोपांचा समावेश आहे. सध्या ढेरे यांच्या स्ट्रॉबेरीला तालुक्यातील बाजारपेठेत ३५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यामधून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

स्ट्रॉबेरीपासून लाभ

स्ट्रॉबेरीपासून अँटिऑक्सिडंट्स व पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात. जे अनेक आरोग्य समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतात. यातील व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास, कर्करोगापासून बचाव करण्यास व स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ढेरे यांनी लावलेली स्ट्रॉबेरी रसायनमुक्त फळ आहे. त्यामुळे या फळांना अधिक मागणी आहे. ही फळे सध्या ॲमेझॉन वेबसाईटवरून देखील विकली जात आहेत. ‘ॲमेझॉन’वर व उच्चभ्रू मॉलमध्ये फोनद्वारे या फळांना तीनशेपन्नास रुपये भाव मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *