कृषी

Unseasonal Rain Maharashtra : अवकाळी पावसाने नाशिकमध्ये द्राक्षे, तर कोकणातील हापूसला बसला फटका

Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागात मागच्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान सातारा, नाशिकसह कोकणात मात्र जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली. याचबरोबर पुढचे दोन दिवस उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत रविवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली.

सातारा परिसरात शनिवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सुमारे दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. ठिकठिकाणी तळघरात पाणी शिरल्याने स्टेशनरी, इलेक्ट्रिक साहित्य, सौंदर्य प्रसाधने यांसह भाजी मंडईतील साहित्य भिजून व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सातारा शहर व परिसराला शनिवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरी बरसल्या. मात्र, यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. विजांच्या कडकडाटासह पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहिले.

देवगड तालुक्यात अवकाळीची हजेरी

देवगड (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यात शनिवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे आंबा पिकावर याचा मोठा परिणाम होणार आहे. काही प्रमाणात मोहोर येण्यास सुरुवात झाली असतानाच, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मोहोर आलेल्या कलमांवर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव व मोहोर काळा पडून वाया जाण्याची शक्यता आहे.

शनिवारी अवकाळीने विजेच्या कडकडाटासह देवगड तालुक्यामध्ये हजेरी लावल्यामुळे आंबा मोहोरावर याचा परिणाम होणार आहे. काही कलमांना ऑक्टोबर अखेरीस मोहोर येण्यास सुरुवात झाली. ८० टक्के कलमांना पालवी व तालुक्यातील किरकोळ २० टक्के कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *