Washim Crop Insurance: नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना प्रशासनाच्या दप्तरी केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे नमूद असून मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे.
जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले होते या पावसाने तुर पिकाचे अतोनात नुकसान झाले तर रब्बीच्या हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम सुरू केल्याचे जाहीर केले होते.
घायकुतीला आलेल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा असतांना जिल्हा प्रशासनाने ता. १८ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केलेल्या नुकसानभरपाई मागणी पत्रात केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्केपेक्षाजास्त नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.
वास्तविक नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना जिल्ह्यातील तीन तालुके निरंक का झाले याबाबत शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या पवित्र्याने तीन तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.
६३,९२६ एकरचेच नुकसान
प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केलेल्या मागणीत वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील ६३ हजार ९२६ एकर नुकसान झाल्याचे नमूद करून ७६ कोटी ३७ लाखांची मदत देण्याची विनंती केली आहे. मात्र ही रक्कम तीनच तालुक्यातच वितरित करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या घिसाडघाईने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. याचा अर्थ तीन तालुक्यातील महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा अहवाल सादर केला की तयारच केला नाही ही शंका आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. वंचित राहीलेल्या तीन तालुक्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांप्रती किती बेजबाबदार आहेत याची प्रचिती पुन्हा आली आहे- गजानन भोयर, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड