नवी दिल्ली : दिल्लीतील इस्राइलच्या दुतावासाबाहेर मंगळवारी झालेल्या स्फोटामुळं खळबळ उडाली होती. यानंतर भारतातील इस्राइली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्राइल नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं नवी अॅडव्हाझरी लागू केली आहे.
अॅडव्हायझरीत काय म्हटलंय?
भारतात राहणाऱ्या इस्राइली नागरिकांसाठी काढण्यात आलेल्या अॅडव्हायझरीत म्हटलं की, इस्राइली नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. यामध्ये मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल-बार आणि मार्केटसारख्या ठिकाणांची न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच भारतातील जी ज्यू धर्मियांची स्थळं आहेत किंवा इस्राइलशी संबंधित ठिकाणांना भेटी देणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच इस्राइली सिम्बॉल दाखवणं टाळावं असंही यामध्ये म्हटलं आहे.
त्याचबरोबर जिथं योग्य सुरक्षितता नसेल अशा कार्यक्रमांना हजेरी लावू नये. त्याचबरोबर ट्रिपला गेल्यानंतर तिथले रिअल टाइम फोटोज, ठिकाणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करु नये.
स्फोटानंतर इस्राइली राजदुतांचं स्पष्टीकरण
दुतावासाबाहेर स्फोटानंतर इस्राइलच्या डेप्युटी राजदुतांनी सांगितलं की, आमचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. तसेच सर्व राजदूत हे देखील सुरक्षित आहेत. आमची सुरक्षा टीम स्थानिक दिल्ली पोलिसांसोबत तपासकार्य आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवारी, 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या इस्राइलच्या दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची माहिती दिल्ली पोलिसांना फोनवरुन देण्यात आली होती. या स्फोटाचं स्वरुप एक प्रकारचा हल्ला देखील असू शकला असता. हा हल्ला कोणी घडवून आणला याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. पण इस्राइल-पॅलेस्टाइन यांच्यात चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही घटना घडली आहे.