बंगळूर : हावेरी जिल्ह्यातील सावनूर तालुक्यातील बेविनहळ्ळी क्रॉसजवळ मंगळवारी राज्य महामंडळाची (KSRTC) बस उलटल्याने शैक्षणिक सहलीला जाणारे ४५ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चालकासह चौघांची प्रकृती गंभीर आहे.
सर्व जखमी विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. लिंगसूर तालुक्यातील सज्जलगुड्डा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील ५३ विद्यार्थी आणि सहा शिक्षक महामंडळाची बस बुक करून शिग्गावी तालुक्यातील गोटगोडी येथील रॉक गार्डन पाहण्यासाठी जात होते.
बेविनहळ्ळी क्रॉसजवळ विरुद्ध बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीची धडक टाळण्याचा प्रयत्न करत असताना बस उलटली. त्यात चालक मलप्पा होसूर आणि विव्या सज्जलगुड्डा, सविता रवी रेड्डी, गुरु गौडा या गंभीर जखमी विद्यार्थ्यांना हुबळी किम्स येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.