Petrol Pump Strike for New Motor Vehicle Act : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस-ट्रक चालकांनी केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. अनेक भागात याचा परिणाम दिसून येत आहे.
केंद्र सरकारने हिट अँड रनबाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात बस-ट्रक चालक संपावर असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
केंद्र सरकारने आणलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले आहेत. हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी मुंबई, इंदूर, दिल्ली-हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रकचालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत.
काय आहे ‘हिट अँड रन’ नवीन कायदा?
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.
यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.
नवीन कायद्याविरोधात ट्रकचालकांमध्ये संताप
सरकारच्या या निर्णयानंतर ट्रकचालकांमध्ये प्रचंड संताप आहे. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल. याबाबत, ग्रेटर नोएडाच्या इकोटेक 3 भागात ट्रक चालकांनी आपली वाहने उभी करून रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली वाहने हटवली.
राज्यभरातील पेट्रोल पंप बाहेर रांगाच रांगा
केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे. संपामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील काही पेट्रोल पंप सोमवारी बंद होते. त्यात मंगळवारी पेट्रोल मिळणार नाही, या अफवेमुळे सोमवारी सुरू असलेल्या पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी झाली होती.
सोमवारी रात्री पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गर्दी कमी झाली होती. दरम्यान, वाहनचालकांच्या संपामुळे इंधन मिळणार नाही, या भीतीमुळे तसेच इंधनाची दरवाढ होणार आहे, अशी अफवा पसरल्यामुळे गर्दीत भर पडली आहे. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी दिवसभर पुणे शहरातील काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. तर, काही पंप बंद दिसून आले.
मुंबईत ट्रकचालक संपावर
मध्य प्रदेश, दिल्लीसह महाराष्ट्रातही संपाचा परिणाम दिसून आला. जिथे सरकारने आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली. त्यांच्या संपामुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
इंदूरमध्येही चक्का जाम
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल पंपांवरही झाला. येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रकचालकांचा हा संप तीन दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपापर्यंत इंधन पोहोचू शकणार नाही. ही बातमी पसरताच लोक पेट्रोल पंपावर पोहोचू लागले, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
देवासमध्ये वाहनचालकांचा रोष
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात बस आणि ट्रक चालकांचा संताप दिसून आला. यावेळी त्यांनी शहरात 2-3 ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रसूलपूर बायपासवर दोन तास रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी पोलिस व प्रशासनाकडून समजावूनही वाहनचालक मान्य न झाल्याने निदर्शने सुरूच होती.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात बस आणि ट्रक चालकांनी राष्ट्रीय महामार्ग-39 रोखून धरला. बसचालकांच्या संपामुळे प्रवाशांचेही हाल झाले. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘काळा कायदा मागे घ्या’च्या घोषणा दिल्या.