देशातील रस्त्यांवर खड्डे असणं ही नवी गोष्ट नाहीये. या खड्ड्यांमुळे सर्वच जण त्रस्त असतात, अनेकदा प्रवाशांसाठी हे खड्डे प्राणघातक देखील ठरतात, अशा घटनांमध्ये आजवर अनेकप्रवासीही दगावले देखील आहेत. पण हरियाणातील एका 80 वर्षांच्या वृद्धासाठी हाच रस्त्यावरील खड्डा जीवनदायी ठरला आहे. असा दावा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. (dead old man comes alive after ambulance hits pathole in hariyana)
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दर्शन सिंग ब्रार यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. तसेच त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता. दर्शन सिंग यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव पतियाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते. जिथे त्यांचे अंतिम संस्कार होणार होते. अंत्यसंस्कारासाठी गावात लाकडे देखील गोळा करण्यात आली. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर अचानक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि जोराचा धक्का बसला.
ब्रार कुटुंबीयांनी दावा केला आहे की, रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत असलेल्या दर्शन सिंग यांच्या नातवाने त्यानंतर त्यांना त्यांचा हात हलवताना पाहिलं. तसेच हृदयाचे ठोके देखीव जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णवाहिका ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.
तेथे डॉक्टरांनी दर्शन सिंग यांना जिवंत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या दर्शन सिंग यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान कुटुंबीयांनी या घटनेला चमत्कार म्हटले आहे आणि आता दर्शन सिंग लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे.