नवी दिल्ली- भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलं आहे. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला असून जहाजावर असलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं आहे.
गेल्या ३६ तासातील भारतीय नौदलाचे हे दुसरे यशस्वी मिशन आहे. FV Iman नावाचे इराणचा झेंडा असलेले मासेमारी करणारे जहाज सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतले होते. यावर १७ कर्मचारी होते. पूर्व सोमालीया किनारा आणि गल्फ ऑफ एडनच्या दरम्यान भारतीय नौदलाने मोहीम राबवून चाच्यांना हुसकावून लावले होते. या जहाजाला पुन्हा रवाना करण्यात आले होते.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा झेंडा असलेल्या एका मासेमारी जहाजावर सोमालियन चाच्यांनी ताबा मिळवला होता. जहाजावर असणाऱ्या १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना त्यांनी बंधक बनवलं होतं. नौदलाला माहिती मिळाल्यानंतर एसओपीनुसार मोहीम आखण्यात आली. त्यानंतर १९ पाकिस्तान नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
इस्राइल-हमास युद्धाचा भडका उडाल्यापासून अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. काही भारतीय जहाजांवर देखील हल्ला झाला आहे. त्यानंतर भारताकडून या भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. आयएनएस सुमित्राने गेल्या ३६ तासांत दुसरे यशस्वी मिशन पार पाडले.