नवी दिल्ली- इस्राइल-हमास युद्ध सुरु असताना आता इराणने इराकवर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे इस्राइलची गुप्तहेर संघटना मोसादच्या इराकमधील केंद्रावर हा हल्ला करण्यात आला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सने सांगितलं की, ‘इराकच्या कुर्दिस्तानच्या भागात बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केला आहे.’ या हल्ल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, मोसादचे कार्यालय आणि आयएस दहशतवादी समूहांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. सीरिया आणि इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान भागात दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणच्या सरकारी मीडियाने केला आहे. या हल्ल्यामुळे मिडल इस्टमध्ये तणाव वाढणार आहे.
इराणमधील IRNA वृत्तसंस्थेने सांगितलं की, हल्ल्यामध्ये कुर्दिस्तानची राजधानी अर्बिलमध्ये एका गुप्तहेर संघटनेचे कार्यालय आणि इराण विरोधी दहशतवादी समूहाच्या ठिकाणांवर हल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहाजण जखमी झाले आहेत.
कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टीने सांगितलं की, मृतांमध्ये नागरिकांचा समावेश आहे. इराणने दावा केलाय की, मोसादचे गुप्तहेर याठिकाणी गुप्त माहिती गोळा करत होते. तसेच याठिकाणी दहशतवाद्यांना गोळा करुन हल्ला करण्याचा कट रचला जात होता. दरम्यान, या ताज्या हल्ल्यामुळे इस्राइल-हमास युद्धाचा भडका इतर देशांमध्ये देखील उडण्याची शक्यता आहे.