Israel Hamas War: हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे.
हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. लष्कराने याला हमासच्या नेटवर्कचा ‘सर्वात मोठा’ बोगदा म्हटले आहे. या चार किमीच्या बोगद्यातून वाहनांची ये-जाही शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा दावाही लष्कराने केला आहे, ज्याचा वापर हल्ल्यासाठी केला जाणार होता.
बोगद्याचे प्रवेशद्वार तटबंदीच्या इरेझ क्रॉसिंगपासून आणि जवळच्या इस्रायली लष्करी तळापासून केवळ काहीशे मीटर अंतरावर आहे.
लष्कराने सांगितले की, हा बोगदा चार किलोमीटरहून अधिक लांब आहे आणि त्याची रुंदी इतकी आहे की, त्यातून वाहने आरामात जाऊ शकतात. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा बोगदा गाझामधील एका मोठ्या बोगद्याच्या नेटवर्कशी जोडलेला आहे, जिथून 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या तयारीसाठी वाहने, अतिरेकी आणि शस्त्रे पुरवली गेली असावीत.
“सध्या हा गाझामधील सर्वात मोठा बोगदा आहे,” असे मुख्य लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी शुक्रवारी बोगद्याच्या प्रवेशद्वाराला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मात्र, हा बोगदा ऑक्टोबर २०१६ मध्ये वापरण्यात आला होता की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लष्कराचे प्रवक्ते मेजर नीर दिनार यांनी सांगितले की, इस्रायली सुरक्षा दलांना 7 ऑक्टोबरपूर्वी बोगद्याची माहिती नव्हती कारण इस्राइलच्या सीमा रक्षकांना फक्त इस्रायइमध्ये प्रवेश करणारे बोगदे सापडले. शुक्रवारी बोगद्याला भेट दिलेल्या दिनार यांनी सांगितले की, तो गाझामध्ये सापडलेल्या इतर बोगद्यांपेक्षा दुप्पट उंच आणि तीनपट रुंद आहे.
ते पुढे म्हणाले की, बोगदा हवेशीर आणि विजेने सुसज्ज आहे आणि काही ठिकाणी तो 50 मीटर खोलवर जातो. बोगद्याचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी लाखो डॉलर्स, तसेच मोठ्या प्रमाणात इंधन आणि कामगारांची आवश्यकता असेल. यादरम्यान हागारीने हमास नेता याह्या सिनवार याचा भाऊ मोहम्मद सिनवार यांचा व्हिडिओही दाखवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वाहनात बसून बोगद्याच्या आत गाडी चालवत आहेत.