नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपचे सात आमदार खरेदी करु पाहात आहे. तसेच दिल्लीतील सरकार अस्थिर करण्यसाठी भाजपने आमदारांना प्रत्येकी तब्बल २५ कोटी रुपये ऑफर केलेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या सात आमदारांना संपर्क करण्यात आला आहे. काही दिवसात केजरीवाल यांना अटक करण्यात येईल. त्यानंतर आमदारांना फोडण्यात येईल.२१ आमदारांसोबत चर्चा सुरु आहे. दिल्लीतील सरकार पडणार. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला २५ कोटी रुपये देऊ, भाजकडून तिकीट देऊ असं त्यांना सांगण्यात येतंय.
२१ आमदारांसोबत संपर्क साधल्याचं बोललं जातंय. पण, आमच्या माहितीनुसार आतापर्यंत ७ आमदारांना संपर्क साधण्यात आला आहे. मद्य घोटाळ्यात मला अटक करुन दिल्ली सरकार पाडण्याचा कट भाजप रचत आहे. गेल्या नऊ महिन्यात आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले आहेत. पण, त्यांना आतापर्यंत यश आलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.