दक्षिण कोरियामध्ये विरोधीपक्ष नेते ली जे-म्युंग यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या पक्षाची प्रेस कॉन्फ्रस सुरू असताना त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले.बुसान येथे ही पत्रकार परिषद सुरु होती. 2022 मध्ये राष्ट्रपती निवडणूक ते अगदी थोड्या फरकाने हारले होते.
दरम्यान ली जे-म्युंग यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला जखम झाली आहे, तसेच हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आली आहे. चाकू हल्ल्यानंतर 20 मिनीटात त्यांना रुग्णालयात पोहचवण्यात आले. योनहाप न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार ते शुद्धीवर होते.
बुसान येथील आपत्कालीन कार्यालयाने सांगितले की, ली हे बुसान शहरातील नवीन विमानतळाच्या बांधकामाच्या जागेला भेट देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. मुख्य विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख ली या हल्ल्यात बेशुद्ध पडले परंतु त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे की, हल्लेखोराने लीयांच्या मानेवर वार करण्यासाठी चाकूसारख्या शस्त्राचा वापर केला.
मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोराचे वय 50 ते 60 दरम्यान होते. ऑटोग्राफ मागण्यासाठी तो ली यांच्या जवळ आला होता. मग अचानक तो वार करायला पुढे सरसावला. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये वार केल्यानंतर ली जमिनीवर पडताना दिसत आहेत. ली यांच्या आजूबाजूच्या लोकांनी हल्लेखोराला लगेच पकडले. या घटनेनंतर घेतलेल्या फोटोमध्ये ली यांच्या गळ्यावर रुमाल बांधलेला दिसत होता आणि ते जमिनीवर पडलेले दिसून आले.
ली हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरियाचे नेत आहेत. ते सध्या दक्षिण कोरियाच्या विधानसभेचे सदस्य नाहीत, परंतु एप्रिल 2024 मध्ये होणार्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीत ते एका जागेसाठी उभे राहतील अशी अपेक्षा आहे. ते 2022 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष यून सुक-योल यांच्याकडून केवळ 0.73 टक्के मतांच्या फरकाने पराभूत झाले. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील ही सर्वात बरोबरीची राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत होती. 2027 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते उभे राहतील अशी अपेक्षा आहे.