नवी दिल्ली- नव्या अध्यक्षांच्या नेतृत्त्वात मालदीव भारतापासून दूर जात असल्याचं चित्र आहे. कारण नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइझू विदेश दौरा करणार असून ते सर्वात आधी भारतात येत नसून चीनमध्ये जात आहेत. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे मालदीवचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकत असल्याचं दिसत आहे. ( Maldivian President Mohamed Muizzu is likely to be travelling to China first)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुइझू हे जानेवारीमध्ये तिसरा परदेश दौरा करणार आहेत. सर्वसाधारणपणे मालदीवचे नवे अध्यक्ष सर्वात आधी भारताला भेट देत असतात. पण, मुइझू हे सर्वात आधी बिजिंगला भेट देत आहेत. त्यामुळे त्यांनी भारतापेक्षा चीनला अधिक महत्व दिल्याचं स्पष्ट आहे. भारताच्या अगदी जवळ असणाऱ्या या देशाच्या भूमिकेमुळे भारताच्या चिंतेत भर पडणार आहे.
मूइझू हे नोव्हेंबरमध्ये सत्ता पदावर आले आहेत. मुइझू हे सुरुवातीपासूनच चीन समर्थक असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या चीनला आधी भेट देण्याच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. असे असले तरी मालदीवकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
२००८ मध्ये मालदीवमध्ये पहिल्यांदा लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नाषिद यांचे सरकार आले होते. तेव्हापासून सर्व अध्यक्षांनी भारताला प्राधान्य दिलं होतं. मोहम्मद वाहीद आणि अब्दुल्ला यामीन यांची सरकारे अनुक्रमे २०१२ आणि २०१४ सत्तेत आली होती. दोन्ही नेत्यांनी भारताला झुकते माप दिले होते.
मुइझू सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशाची भूमिका बदलली आहे. त्यांनी सर्वात आधी तुर्की देशाचा दौरा केला. त्यानंतर ते सीओपी परिषदेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे गेले होते. त्यानंतर ते आता बिजिंगला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुइझू सत्तेत आल्यानंतर मालदीवमधील भारतीय सैनिक परत बोलावले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच भारतासोबत पाणी सर्वेक्षण करार न करण्याचा निर्णय घेतलाय.