नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ताण-तणावाला विद्यार्थ्यांनी कसं समोरं जायचं? या विषयावर भाष्य करताना मोदींनी पालक आणि शिक्षकांनाही काही सूचना केल्या आहेत.
पालकांना आवाहन
पालकांना महत्वाचं आवाहन करताना मोदी म्हणाले, अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर मुलांची उदाहरणं देतात. पालकांनी अशा गोष्टी करणं टाळायला हवं. मी असेही पालक पाहिले आहेत की जे आपल्या आयुष्यात जास्त यशस्वी ठरले नाहीत किंवा त्यांनी महत्वाची कामगिरी केली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांचं रिपोर्ट कार्ड हे आपलं व्हिजिटिंग कार्ड म्हणून घडवलं. जेव्हा केव्हा ते एखाद्याला भेटतात तेव्हा ते आपल्या मुलांची गोष्ट इतरांना सांगतात.
शिक्षकांना आवाहन
विद्यार्थ्यांचा तणाव कसा दूर करायचा असा विचार जर शिक्षक करत असतील तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, विद्यार्थ्यांशी असलेलं तुमचं नात हे पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या पहिल्या दिवसापर्यंत वृधिंगत व्हायला हवं. त्यामुळं त्यांना परीक्षेत तणाव होणार नाही. यामुळं शिक्षकांचंही विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त चांगलं नात निर्माण होईल. यामुळं विद्यार्थीही देखील तुम्हाला त्यांचे विचार आणि छोट्यामोठ्या अडचणी शेअर करतील.
विद्यार्थ्यांना दिला सल्ला
विद्यार्थ्यांना सल्ला देताना मोदी म्हणाले, तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी मोबाईल फोनचा वापर करतात. काहीजण असे असतील ज्यांना तासन् तास मोबाईल पाहण्याची सवल लागली आहे. पण हे दररोज वापरल्या जाणाऱ्या मोबाईललाही चार्ज करावं लागतं. जर मोबाईलला चार्जिंग करावं लागतं तर आपल्या शरिराला देखील केलं पाहिजे.
तसेच तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. पाण्याची खोली किती असेल यानं काही फरक पडत नाही. एकदा तुम्हाला कळालं की पोहायचं कसं तर तुम्ही सहज त्या खोल पण्यातही तग धरु शकता. त्याचप्रकारे प्रश्नपत्रिका कितीही अवघड असू देत तुम्ही चांगला सराव केला असेल तर तुमची कामगिरीही उत्तमच असेल. इतर लोक काय करतात याचा विचार करत बसू नका, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.