PM Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. काल (रविवारी) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 जागांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. याआधी १९९१ ते १९९६ या काळात शेख हसीनाही पंतप्रधान होत्या.
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने 300 संसदीय जागांपैकी 224 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने चार जागा जिंकल्या. अपक्षांनी 62 जागा जिंकल्या आहेत तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.
शेख हसीना यांनी त्यांची लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-3 मोठ्या मताधिक्याने जिंकली. त्यांना २,४९,९६५ मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी ४६९ मते मिळाली. शेख हसीना 1986 नंतर आठव्यांदा गोपालगंज-3 मधून निवडणूक जिंकल्या आहेत.
यासोबतच शेख हसीना यांनी सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही केला आहे. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटकपक्षाला 299 जागांपैकी 152 जागा मिळाल्या आहेत. एका उमेदवाराचं निधन झाल्यामुळे एका जागेवर नंतर निवडणूका होणार आहेत.देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढत असलेल्या घटक पक्षांनी या निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणूकीदरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली होती.
केवळ 40 टक्के मतदान झाले
2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत विक्रमी 80 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. परिणामी निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. त्याचवेळी अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी दावा केला की, लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा बहिष्कार नाकारला.
निवडणुकीपूर्वी बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या होत्या. रविवारीही मतदानादरम्यान देशभरात 18 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 10 मतदान केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्यांनी या निवडणुका फसव्या असल्याचे म्हटले आहे. बीएनपीने 2014 च्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकला होता. मात्र, 2018 मध्ये पक्षाने निवडणूक लढवली. यावेळी पुन्हा बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यासोबतच 15 राजकीय पक्षांनीही बहिष्कार टाकला होता. बीएनपीने 48 तासांचा संपही आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. कमी मतदान हा त्यांचा बहिष्कार यशस्वी झाल्याचा पुरावा असल्याचा दावा बीएनपीच्या नेत्यांनी केला आहे.
यावेळी लोकांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह नसल्याचे सांगण्यात येत होते. मतदान केंद्रावरही लांबच लांब रांगा लागल्या नाहीत. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सिटी कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सायमा वाजेदही होती. शेख हसीना यांनी बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीवर लोकशाहीवर विश्वास नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी भारताची स्तुती करत भारताला विश्वासू मित्र म्हटले होते.
या निवडणुकीत 436 अपक्ष उमेदवारांशिवाय 27 राजकीय पक्षांचे 1500 हून अधिक उमेदवार रिंगणात होते. माजी निवडणूक आयुक्त ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) सखावत हुसेन यांनी गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक अनोखी असल्याचे वर्णन केले.