देश - विदेश

लालकृष्ण आडवाणी- मुरली मनोहर जोशी राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी येणार नाहीत; राम मंदिर ट्रस्टची माहिती

अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत.

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे आरोग्य आणि वयामुळे त्यांना न येण्याची विनंती राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली होती. ट्रस्टची विनंती दोन्ही नेत्यांनी स्वीकारल्याची माहिती आहे.

आडवाणी आणि जोशी हे खूप वयस्कर आहेत. त्यांचे वय लक्षात घेता. आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली होती. दोन्ही नेत्यांनी ते मान्य केलंय, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख सचिव चंपत राय यांनी दिली. 

अयोध्येत राम मंदिर उभारले जावे यासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी ९० च्या दशकात रथयात्रा काढली होती. त्यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा राम मंदिराच्या वातावारण निर्मितीसाठी झाला होता. मुरली मनोहर जोशी यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. त्यामुळे हे दोन्ही नेते राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी उपस्थित राहण्याची दाट शक्यता होती. आडवाणी हे ९६ तर जोशी हे ९० वर्षांचे आहेत.

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाची प्रतिष्ठापणा होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. कार्यक्रमाची तयारी १५ जानेवारीला पूर्ण होईल. त्यानंतर प्राण प्रतिष्ठा १६ तारखेपासून सुरु होईल आणि २२ जानेवारीला संपेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली.

चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४००० साधू-पुजारी आणि २२०० इतर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर २४ तारखेला मंडल पूजा करण्यात येईल. भाविकांसाठी मंदिर २३ जानेवारीपासून खुलं असेल. पाहुण्यांच्या राहण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *