वॉशिंग्टन– अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या रिपब्लिकन पक्षात झालेल्या आयोवा कॉकसच्या पहिल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे रिपब्लिक पक्षाकडून अध्यक्षीय उमेदवारी म्हणून त्यांची दावेदारी पक्की समजली जात आहे. डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ उमेदवार आहेत. गेल्या एक वर्षांपासून ते या शर्यथीत आघाडीवर आहेत. आयोवा कॉकसच्या निवडणुकीत त्यांनी स्पष्ट विजय प्राप्त केलाय. त्यामुळे ते पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सध्या अमेरिकेच्या कोर्टात खटले सुरु आहेत. त्यामुळे ते काहीशे अडचणीत सापडले आहेत. कायदेशीर लढाईमुळे त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात होतं. पण, आयोवाच्या विजयाने दाखवून दिलंय की त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा अद्याप कायम आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.
आयोवा कॉकसच्या सुरुवातीच्या कलांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती. त्यांना सुरुवातीला एक तृतियांश मते मिळाली होती. त्यामुळे पुढील मतमोजणी औपचारिकता ठरली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना पर्याय म्हणून फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसेटिस आणि माजी यूएन अॅम्बेसेडर निक्की हेले हे समोर आले आहेत. पण, ट्रम्प सध्यातरी त्यांच्यावर मात करताना दिसत आहेत.
७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प हे बायडेन यांना थेट टक्कर देण्याचीच दाट शक्यता आहे. जो बायडेन यांची लोकप्रियता घटली आहे. हे डेमोक्रेटमधील नेते देखील मान्य करु लागले आहेत. जो बायडेन यांचे वय झाल्याने ते अध्यक्षपद सांभाळण्यास सक्षम राहिले नाहीत असा मुद्दा पुढे केला जात आहे. याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना होण्याची शक्यता आहे.