Ind W Vs Aus W 3rd T20 : नाणेफेकीवर टी-20 मालिकेचे भवितव्य? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक सामना मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रलियाविरुद्ध प्रथमच ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघासमोर असलेली संधी अजून कायम आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होत आहे, परंतु हे सर्व यश बहुधा नाणेफेकीवर अवलंबून असणार आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या या मालिकेत प्रथम फलंदाजी करणे अवघड होत आहे आणि त्यानंतर धावांचा पाठलाग सोपा असल्याचे पहिल्या दोन सामन्यांतून स्पष्ट झाले. त्यामुळे उद्या नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाजी स्वीकारणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल, असे पहिल्या दोन सामन्यातून स्पष्ट होत आहे.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १४१ धावांत गारद झाला. भारतीयांनी हे आव्हान १७.४ षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. रविवाच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. २० षटकांत जेमतेम १३० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला. याप्रसंगी भारताच्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाचा कस लागेल हे निश्चित आहे.
विजयी सांगता करणार?
भारतीय महिलांसाठी दीड महिन्यांचा कालावधी क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव देणारा ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी-एकदिवसीय-टी-२० आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही कसोटी-एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्याची संधी मिळाली. उद्या विजयी सांगता करण्यासाठी भारतीय महिला प्रयत्नशील असतील.
काय आहे कारण….
याचे प्रमुख कारण सायंकाळच्या सत्रात (७ वाजता) खेळ सुरू झाल्यावर हवा थंड होत असल्याने चेंडू चांगल्या प्रमाणात स्विंग होतात, त्यामुळे फलंदाजी अवघड होते. ८.३० नंतर दुसरी इनिंग सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात दव मैदानावल आलेले असते, त्यामुळे चेंडू स्विंग किंवा फिरकही घेत नाही. उलट चांगल्या प्रमाणात बॅटवर येतो. याचा फायदा दुसऱ्या डावात फलंदाजी करताना होतो.
काय करावे लागणार?
नाणेफेकीचा कौल कोणाचाच हातात नसल्यामुळे उद्या प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली तर किमान दीडशे धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला सावध पवित्रा घेऊन विकेट हातात ठेवाव्या लागतील आणि अंतिम षटकांत धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर दवामुळे ओला झालेल्या चेंडूवर गोलंदाजी करण्याची वेळ आली तर किमान अचुक टप्पा ठेवावा लागेल.
एकमेव विजय
टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलिया विश्वविजेते आहे आणि यंदाच्या वर्षात विश्वकरंडक होणार आहे, त्यामुळे आताचा मालिका विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकेल. भारताने २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. टी-२० प्रकारातील भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो एकमेव मालिका विजय आहे.
रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर १३० धावांचेच पाठबळ होते, तरी त्यांनी चांगला लढा दिला.