IPL Betting : पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटसनुसार आयपीएलमध्ये काही लोक बेटिंग करत असल्याची दोन प्रकरणे सीबीआयने पुरेशा पुराव्याऐवजी बंद केली आहेत. यासंदर्भात सीबीआयने मे २०२२ मध्ये एफआयर नोंदवला होता.
यातील पहिल्या एफआयआरमघ्ये दिलीप कुमार (दिल्ली), रोहिणी आणि गुराम वासू तसेच गुराम सतिथ (हैदराबाद) यांच्याविरुद्ध सीबीआयने पहिला एफआयआर नोंदवला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या एफआयआरमध्ये सज्जन सिंग, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा (सर्व राजस्थान) यांची नावे होती.
दोन वर्षे या प्रकरणाची चौकशी सुरू होती, परंतु सीबीआयला कोणाविरुद्धही ठोस पुरावे सापडले नाहीत त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल तयार केला आणि तो २३ डिसेंबर रोजी न्यायालयात सादर केला. त्यात आरोप, चौकशी असे सर्व मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
हा अहवाल स्वीकारायचा की अधिक तपास करावा याबाबत सीबीआयला सूचना द्यायच्या, हे आता न्यायालयाच्या हाती आहे, असे सूत्रांनी सांगितले. आरोप करण्यात आलेल्या सर्वांचा गेल्या १० ते १३ वर्षांतील इतिहास तपासण्यात आला. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहारही पाहण्यात आले. त्यात सीबीआयला आक्षेपार्ह काही सापडले नाही, अशी माहिती देण्यात आली.