Ranji Trophy 2024 : हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात देखील समालोचक हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवालची चर्चा आहे. हैदराबादच्या तन्मयने रणजी ट्रॉफीमध्ये असा मोठा कारनामा करून दाखवला आहे की आकाश चोप्रा सारखे माजी भारतीय खेळाडू देखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
तन्मयने रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपच्या हैदराबाद आणि अरूणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात इतिहास रचला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक ठोकले. 28 वर्षाच्या तन्मयने 147 चेंडूत 300 धावा ठोकल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मराईसचा विश्वविक्रम मोडला. त्याने बॉर्डर आणि वेस्टर्न प्रोविंस यांच्यात झालेल्या सामन्यात 191 चेंडूत त्रिशतक ठोकलं होतं.
हैदराबादने एका विकेटच्या मोबदल्यात 48 षटकात 529 धावा केल्या. तन्मयने 160 चेंडूत नााद 323 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी अरूणाचल प्रदेशचा संघ 172 धावांवर ऑल आऊट झाला होता. तन्मयने आपल्या खेळीड 33 चौकार आणि 21 षटकार मारले आहेत. त्याने राहुल सिंह सोबत पहिल्या विकेटसाठी 449 धावांची भागीदारी रचली.
पहिल्या दिवशी तन्मय 323 धावांवर नाबाद होता. त्याला भाऊसाहेब निंबाळकर आणि लाराचा विक्रम देखील मोडण्याची संधी होती. मात्र तो दुसऱ्या दिवशी 181 चेंडूत 366 धावा केल्या. त्याने या धावा 202 च्या स्ट्राईक रेटने केल्या.
या खेळीनंतर तन्मय म्हणाला, ‘मी ज्यावेळी 150 धावा केल्या त्यावेळी आक्रमक खेळण्यास सुरूवात केली. मला नशिबानं साथ दिली. मी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मला पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यानंतर रेकॉर्ड झाल्यचं समजलं.’
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ही ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने 501 धावा केल्या होत्या. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने वार्विकशायर कडून खेळत डरहमविरूद्ध ही खेळी केली होती. भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम हा भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर आहे. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरूद्ध काठियावाड सामन्यात 443 धावा केल्या होत्या.