South Africa vs India 1st Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे. तर फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे.
संघ निवडीवेळी डावखुऱ्या रविंद्र जडेजाची दावेदारी प्रबळ होती. मात्र त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने त्याच्या ऐवजी अश्विनला संधी दिली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. पहिले दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला होता. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेकीनंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ‘या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करावी की गोलंदाजी करावी याबाबत काही सांगता येत नाही. आम्हाला या मैदानावरची परिस्थिती माहिती आहे. आम्ही अनेकवेळा इथे खेळलो आहोत. आम्हाला प्रथम फलंदाजी करताना चांगल्या धावा कराव्या लागती. गोलंदाजांना त्यांचा काम करण्यासाठी काहीतरी द्यावं लागेल.
‘खेळपट्टीवर ग्रास आहे, वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे इथं फंलदाजी करणं आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहिती आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत ज्या ज्यावेळी कसोटी मालिका खेळण्यासाठी येतो त्या त्यावेळी एक आशा घेऊन येतो. गेल्या दोन दौऱ्यात आम्ही इतिहास रचण्याच्या जवळ पोहचलो होतो.’