Cheteshwar Pujara : टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा 2024 च्या काऊंटी हंगामात ससेक्स संघासोबत खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर त्याने काउंटी संघासोबत सलग तिसऱ्या वर्षी करार केला आहे.
26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी संघातून बाहेर गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेला आहे. पुजारा याआधीही ससेक्सकडून खेळला आहे. तो 2024 काउंटी चॅम्पियनशिप हंगामात ससेक्ससाठी पहिले 7 सामने खेळेल.
पुजाराने ससेक्ससाठी आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 64.24 च्या सरासरीने एकूण 1863 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ससेक्समध्ये परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा म्हणाला की, तो आगामी हंगामासाठी खूप उत्सुक आहे.
पुजाराच्या क्लबमध्ये पुनरागमन झाल्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस खूप खूश आहेत. फारब्रेस म्हणाला की, चेतेश्वर पुजाराच्या 2 महिन्यांनी क्लबमध्ये पुनरागमन झाल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्यांचे स्वागत करतो. फारब्रेसच्या मते, ‘तो केवळ महान खेळाडू नाही तर तो एक चांगला माणूसही आहे. त्याचा अफाट अनुभव संघाला उपयोगी पडेल.
पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
35 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा शेवटचा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळला होता. पहिल्या डावात त्याने केवळ 14 धावा तर दुसऱ्या डावात 27 धावा केल्या होत्या. त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने एकूण 7195 धावा केल्या आहेत, ज्यात 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51 धावा केल्या आहेत.