पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले.
पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टीबी वार्ड चौकात सोमवारी (ता.२५) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली.
प्रदिप उईके (वय ३० रा. कुभांरटोली, धंतोली) असे आरोपीचे नाव असून अर्जुन मुन्ना यादव (वय २४, रा. अजनी), आशिश हजारे (वय २४ रा. मनिषनगर) आणि आनंद बिपीनचंद्र शाह (वय ५३ रा. बडकस चौक) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल चौकालगत असलेल्या व्हीआर मॉलमध्ये `एजन्ट जॅक’ नावाचा पब आहे. तिथे रात्री साडेअकरा वाजता अर्जुन आणि आशिष गेले. यावेळी तिथे आनंद शाह हे आपल्या काही मित्रांसह पार्टी करीत होते. याच ठिकाणी प्रदीप त्याचा मित्र आणि दोन मैत्रिणी तिथे आले होते.
आनंद शाह हे आशिषच्या वडिलांचे मित्र असल्याने शाह यांचीही पार्टी संपल्याने आशिषने त्यांना सोडून घरी सोडून देतो असे सांगितले. दरम्यान पबमधून निघत असताना प्रदीपला अर्जुनचा धक्का लागला. त्यामुळे प्रदीपने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात करीत धक्काबुकी केली. आशिषने वाद सोडवित गाडीने तिघेही निघाले.
अर्जुनला प्रथम घरी सोडण्यासाठी तिघेही मेडिकलचा समोरच्या चौकात येत असताना, त्याच्या वाहनासमोर एक दुचाकी आली. त्या दुचाकीमुळे आशिषने कार थांबविली. इतक्यात प्रदीप आपल्या सहा ते साथ साथीदारासह तिथे आला. त्याने तिघांनाही कारमधून काढून मारहाण केली. आनंद शाह यांच्या डोक्यावर गट्टुने वार करीत, गंभीर जखमी केले. याशिवाय अर्जुन आणि आशिष यांनाही जबर मारहाण करीत पसार झाले.
अर्जुनने ही माहिती घरच्यांना देताच, त्याचा मोठा भाऊ आणि इतर मुले आली. त्यांनी आनंद शाह यांना मेडिकल तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिघांवर उपचार सुरू असून आनंद शाह यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान मेडिकलमधून सूचना मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे ताफ्यासह दाखल झाले. आरोपींवर गुन्हा दाखल करीत, त्याचा शोध सुरू केला आहे. प्रदीप उईके हा २०१६ साली अंबाझरी येथे झालेल्या खुनातील मुख्य आरोपी असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहे.