क्राइम

Jalna News : असुरक्षिततेची वाढतेय भावना

शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे.

जालना : उद्योग आणि व्यापाराचे केंद्र असलेल्या जालना शहरात चोऱ्या, वाटमाऱ्या, दरोडे या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. गुन्हे घडल्यानंतर चोरट्यांच्या शोधात पोलिसांची नेहमीच धावपळ होते. मात्र, गुन्हा घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही अपेक्षित असते. त्यासाठी बाजारपेठेसह शहरातील गस्त आणि रात्रीचे कोम्बिग ऑपरेशन, नाकाबंदी असे बेसिक पोलिसींग करत नागरिकांनी सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असते.

मात्र, चार दिवसांपूर्वी भर दिवसा पडलेल्या दरोड्यानंतर जालनेकरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून असुरक्षिततेची भावना नागरिकांत वाढू लागली आहे. आता तरी पोलिस प्रशासन बेसीक पोलिसींगवर भर देणार का? असा प्रश्‍ उपस्थित होत आहे.जालना शहर हे स्टील, सीड सीटीसह व्यापार नगरी आहे. येथे रोज शेकडो कोटींची उलाढाल होते.

त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची रोकड लंपास करणे, महिलांचे दागिने चोरणे, खिसे कापणे, दुचाकी पळविणे, घरफोडी, जबरी चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. मात्र, या शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडे अपुरी साधनसामग्री आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे.

त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यानंतर व्यापारी, उद्योजक किंवा घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर पोलिसांना अवलंबून राहण्याची वेळ येते. त्यात पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याचे तुणतुणे पोलिस प्रशासनाकडून सतत वाजविले जाते. मात्र, दुसरीकडे रिक्तपदे भरून काढण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्यानंतर पोलिस कर्मचारी हजर होत नाहीत. ता. २७ जून रोजी अनेक कर्मचाऱ्यांची खांदे पालट करण्यात आली होती. मात्र, आजही तब्बल ४४ कर्मचाऱ्यांनी आपल्या खुर्च्या सोडलेल्या नाहीत.

त्यामुळे पोलिस प्रशासनातील विविध पोलिस ठाण्यांसह शाखांमधील मनुष्यबळाचे नियोजन न झाल्याने पोलिस प्रशासनाला अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठेसह शहरात दिवसा गस्त आणि रात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे अपेक्षित आहे. शिवाय जिल्ह्यातही नाकाबंदी करून पोलिस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेणे गरजेचे आहे.

मात्र, या बाबी होताना दिसून येत नाहीत. परिणामी शहरात चार दिवसांपूर्वी भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोर पसारही झाले होते. या दरोड्यामुळे पोलिसांच्या गस्तीचे अपयश उघड झाले असून चोरट्यांना पोलिसांची भिती राहिली नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे जालनेकरांच्या सुरक्षेसाठी आता तरी पोलिस प्रशासनाकडून दिवसा गस्त आणि रात्री कॉम्बिंग ऑपरेशनवर भर दिला जाणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून रात्रीची गस्त नियमित केली जात आहे. याशिवाय शहरात दिवसाही पोलिसांची गस्त वाढण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच शहरातील बँक, मुख्य बाजारपेठे असे काही क्राईम लोकेशन शोधून या ठिकाणांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस रेकॉर्डवरील आरोपी, विविध गुन्ह्यांतील जामीनावर, पेरोलवर असलेल्या आरोपींची यादी तयार करून ते तपासण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *