अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पसन्न सिंह ब्यौहारी (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा ते आपल्या अन्य तीन सरकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तिथे पोहोचल्यानंतर काही लोक ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी प्रसन्न सिंह यांनी ट्रक्टरच्या समोर जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक्टर चालकाने त्यांच्या अंगावरून ट्रक्टर घातला आणि फरार झाला. सोन नदीत अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती, मात्र त्याला दाद न देता वाळू माफीयाकडून वाळू अत्खनन सुरूच होते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच तीन पोलीस स्थानकांचे पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घेराबंदी करून आरोपी ट्रॅक्टर चालकाला मेहर जिल्ह्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शुभम विश्वकर्मा असे त्याचे नाव आहे. ट्रॅक्टर मालक प्रशात सिंह आणि आरोपी शुभम मेहरचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शहडोलचे पोलीस अधीक्षक कुमार प्रतिक यांनी दिली.