Mumbai Crime: उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वसई तालुक्यातील नालासोपारा फाटा भागात नाकाबंदी करून दमण बनावटीच्या विदेशी मद्याच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई केली. या वेळी कारमधील ६२ लिटर मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला.
बुधवारी (ता. १०) रात्री केलेल्या कारवाईत चार लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैद्य मद्य वाहतुकीवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा फाटा भागात नाकाबंदी केली होती. या वेळी पथकातील कर्मचाऱ्यांना एक कार संशयास्पदरित्या आढळली.
पोलिसांनी संशयित कार थांबवून तपासणी केल्यानंतर कारमध्ये आढळलेल्या सात बॉक्स मधून ६२.२८ बल्क लिटर मद्याचा साठा आढळून आला. कारवाईत कारसह चार लाख ७० हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी प्रकाशभाई पुरुषोत्तमभाई प्रजापती (वय ३५) आणि रामाभाई वालजीभाई भरवाड (वय ३४, दोघेही वलसाड, गुजरात) यांनी भेसळयुक्त परराज्यातील मद्य साठ्याची वाहतूक करताना कोणताही परवाना नसल्याचे तपासणीत आढळून आले.
उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील दुय्यम निरीक्षक पांडुरंग पडवळ, जवान अमोल नलावडे, योगेश हरपाळे, अनिल पाटील यांनी कारवाई केली.