मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील विरार-शिरसाड फाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना विरार गुन्हे कक्ष शाखा ३ च्या टीमने नुकतीच अटक केली आहे.
यात एका २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोयता, सुरा, बॅटऱ्या, नायलॉनची दोरी, दोन कटावण्या, मिरची पावडर, मोबाईल फोन, दागिने व रोख रक्कम असा १० लाख १६ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा टाकताना कोणी विरोध केल्यास त्याची हत्या करून ही टोळी फरार होत होती.
मनीष ऊर्फ राजू मोहन चव्हाण, भाऊसाहेब शंकर गवळी, अश्विनी रूपचंद चौहान, रवींद्रसिंग सुखराम सोळंकी, सुखचेन रेवत पवार आणि माँटी नंदू चौहान अशी आरोपींची नावे आहेत. मनीष हा या टोळीचा म्होरक्या आहे.
त्याच्यासह भाऊसाहेब आणि अश्विनी हे अहमदनगर जिल्ह्यातील, तर इतर हे मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यातील आहेत. मनीष हा ३० सप्टेंबर २०२३ रोजी तुरुंगातून जामिनावर सुटला होता. ५ जानेवारीला ही टोळी विरारच्या जीवदानी मंदिर पायथ्याशी मुक्कामाला आली होती. विरार गुन्हे शाखा कक्ष ०३ चे पोलिस उपनिरीक्षक उमेश भागवत गस्त घालत असताना त्यांना या टोळीचा संशय आला. त्यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तत्काळ आठ जणांचे पथक बनवून तेथे सापळा लावला.
पोलिसांनी तेथे खेळणाऱ्या मुलांची मदत घेऊन, आरोपीना पकडण्याचा त्यांना प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलिस किरकोळ जखमी झाले. अखेर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. आरोपींवर राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दोघांवर मध्य प्रदेशमध्ये बक्षीस
रवींद्र सोळंकी आणि सुखचंद पवार यांच्यावर मध्य प्रदेशमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर मध्य प्रदेश पोलिसांनी पाच हजारांचे बक्षीस ठेवले असल्याची माहिती मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.