मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुल चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक करून पोलिसांनी बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची 25 दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली होती. या महिलेला मुलगा झाला बाळाचे वजन कमी असल्याने आणि बाळ अशक्त असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अशातच, मालवण परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल करत तिच्या वीस दिवसाच्या बाळाची चोरी केली आहे.
त्या महिलेने मुलाची चोरी केली. ती पळून जात असतानाची दृश्ये रूग्णालयातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मुल चोरीला गेल्याची माहिती समजताच पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनेचा तपास करताना सीसीटिव्हीची मदत घेतली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली. दरम्यान, या महिलेकडे चौकशी केली असता, महिलेचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र तिला मूल होत नव्हते, त्यामुळे ती नाराज होती आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, महिला पहिल्यांदा शताब्दी रुग्णालयात गेली आणि तिने या लहान मुलाच्या आईशी याविषयी बोलली. बाळाच्या आईला विश्वासात घेतल्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले आणि ती बाळासोबत पळून गेली होती. या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहेत.