क्राइम

Vasmat News : गायरान जमीनीवरून वाद; रस्त्यावर हाणामारीत एकाचा मृत्यू

वसमत – वसमत तालुक्यातील चोंढी स्टेशन रस्त्यावर झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. २४ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राहुल गवळी (२८, रा. जूनूना, ता. वसमत) असे मयत तरुणाचे नांव असून गायरान जमीनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील जुनूना येथे मागील काही दिवसांपासून दोन गटात गायरान जमीनीचा वाद सुरु आहे. या वादातून दोन गटात नेहमीच कुरबुरी होत होत्या. त्यानंतर आज सकाळीही गावात दोन गटात चांगलाच वाद झाला होता.

या वादानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहूल हा चोंढीस्टेशनकडे येत असतांना गावातील एका गटाने त्याचा पाठलाग करून त्याला चोंढीस्टेशन रस्त्यावरच गाठले. यावेळी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत राहूल याच्यावर तलवारीचे व चाकूचे वार झाल्याने तो जागीच कोसळला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जूनूना येथील गावकरी घटनास्थळी धावले.

दरम्यान, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, रामदास निरदोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसमतशहर, वसमत ग्रामीण, कुरुंदा पोलिस ठाण्याचा वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मयत राहुल याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात मारहाण करणाऱ्या गटातील काही जणांनी चोंढी स्टेशन जवळीच असलेल्या एका हॉटेलच्या शटरमध्ये स्वतःला कोंडून घेतले आहे. दुसऱ्या गटाकडून हल्ला होऊ नये यासाठी या हॉटेलच्या परिसरात बंदोबस्त असून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मयत राहूल हा ग्रामरोजगार सेवक

मयत राहुल गवळी हा ग्रामरोजगार सेवक म्हणून मागील अडीच वर्षापासून कार्यरत होता. या घटनेमुळे गवळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *