क्राइम

Winter Session Nagpur 2023 : राज्यात वाढताहेत ज्येष्ठांसंदर्भात गुन्हे; ‘क्राइम इन इंडिया’चा अहवाल

नागपुरात ७३ टक्के गुन्ह्यांचा समावेश

Winter Session Nagpur 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित होत चालला असून, ज्येष्ठांच्या संदर्भात देशात सर्वाधिक गुन्हे राज्यात घडत आहेत. शहरांचा विचार केल्यास देशात ज्येष्ठांबाबतचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात २०२२ मध्ये २८ हजार ४५४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात पाच हजार ११० गुन्हे दाखल झाले. राज्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्येत राज्यांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर असून ज्येष्ठांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये मध्यप्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर असून, या राज्यात ६ हजार १८७ गुन्हे दाखल झाले.

शहरांनुसार विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांबाबतचे पहिल्या क्रमांकावरील दिल्लीत १ हजार १३१ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत ५७५ गुन्हे मुंबईत दाखल झाले असून नागपूर सातव्या क्रमांकावर आहे. नागपुरात १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या पहिल्या १९ शहरांत महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. यात मुंबईनंतर, नागपूर आणि पुणे शहराचा समावेश असून, नागपूरमध्ये १७० गुन्हे दाखल झाले.

ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी, खून, मारहाण, फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या ‘क्राइम इन इंडिया’ अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या गुन्ह्यांचा प्रकारानुसार विचार केल्यास, मुंबई, नागपूर आणि पुण्यात १७ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच, नागपुरात ४ आणि सर्वाधिक पुण्यात आठ खून झाले आहेत.

या तीन शहरांत ज्येष्ठ नागरिकांच्या घरी चोरीचे १९९ प्रकार घडले आहेत, तर ६० ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यात आले. लुटीचे ३३ प्रकार मुंबईत, १७ प्रकार नागपूर तर ८ प्रकार पुण्यात घडले. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत सर्वाधिक गुन्हे फसवणुकीचे आहेत.

सर्वाधिक फसवणुकीते गुन्हेही मुंबईत असून १८९ प्रकरणे नोंदविण्यात आलेली आहेत. याबाबतीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर असून ५७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पुण्यात १८ गुन्ह्यांची नोंद केली आहे.

ज्येष्ठांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दर वर्षी वाढ होत असल्याचे दिसून येत असून त्यात सर्वाधिक दर नागपूरचा ७३.७ टक्के आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

राज्यातील गुन्हे

  • दुखापत – १,३३४
  • चोरी -१,२९६
  • लुटणे- ३५६
  • दरोडा -१५
  • धमकाविणे- १०२
  • फसवणूक – ८५०

तीन शहरातील गुन्हे

  • मुंबई – ५७५
  • नागपूर – १७०
  • पुणे – ७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *