Bones Health : वय जसे वाढत जाते, तसे शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे कमजोर झाली की सांध्यामध्ये वेदना होणे, सांधेदुखी होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. हाडांच्या बळकटीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे.
संतुलित आहारामध्ये सर्व पोषकघटकांचा समावेश असणे फायद्याचे ठरते. आहारात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि प्रोटिन्सने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असणे फायदेशीर आहे.
यामुळे, एकूणच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि हाडांना देखील बळकटी मिळते. आज आपण हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर असणाऱ्या पोषकघटकांविषयी जाणून घेणार आहोत.
आहारात समाविष्ट करा कॅल्शिअम
हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शिअमचा आहारात समावेश असणे हे अतिशय महत्वाचे आहे. कॅल्शिअममुळे हाडांना बळकटी मिळते आणि योग्य पोषण मिळते.
कॅल्शिअमयुक्त खाद्यपदार्थ जसे की, दूध, दही, डेअरी प्रॉडक्ट्स, बदाम, ब्रोकोली, केळी आणि सोया उत्पादने इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. या खाद्यपदार्थांमधून तुम्हाला पुरेसे कॅल्शिअम मिळेल.
प्रथिनांनी समृद्ध खाद्यपदार्थ आवश्यक
जर तुम्हाला मजबूत हाडे हवी असतील तर प्रथिनांनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील ५०% हाडे ही प्रथिनांनी बनलेली असतात. हे आपण विसरता कामा नये.
त्यामुळे, प्रथिने ही आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी फायदेशीर आहेत. प्रथिनांनी युक्त असलेला राजमा, दूध, हरभरा, मांस, मासे, कडधान्ये, अंडी, वाटाणा, पालक, मशरूम इत्यादी खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन डी आहे महत्वाचे
व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हिटॅमीन डी ने युक्त असलेले खाद्यपदार्थ जसे की, मासे, अंडी, मशरूम, सोया मिल्क, चीज इत्यादी पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा. यामुळे, तुमच्या हाडांना बळकटी मिळेल आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.