जास्त झोपेच्या समस्या : संतुलित आहार, व्यायाम आणि 6-7 तासांची पुरेशी झोप निरोगी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा तुम्ही रात्री खूप जागून असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात.
परंतु, तुम्हाला माहित आहे का? की जास्त वेळ झोप घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ झोपल्याने आरोग्याचे नुकसान होते. जास्त वेळ झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोणत्या आहेत या समस्या? चला तर मग जाणून घेऊयात.
जास्त वेळ झोपल्याने खालील समस्या निर्माण होतात
मधुमेह
जगात दिवसेंदिवस मधुमेहाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे, आणि ही चिंतेची बाब आहे. जास्त वेळ झोपल्याने ही तुम्हाला मधुमेहाची समस्या निर्माण होऊ शकते, असे अनेक संशोधनातून देखील समोर आले आहे. त्यामुळे, जर तुम्ही जास्त वेळ झोप घेत असाल तर वेळीच थांबा.
डोकेदुखी
अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकीच एक कारण म्हणजे जास्त वेळ झोप घेणे. सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही जास्त वेळ झोप घेतली तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
जास्त वेळ झोपल्याने सेरोटोनिनसह मेंदूतील काही न्यूरोट्रांसमीटरवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे, डोकेदुखी होते. तसेच, जे लोक दिवसभर खूप झोपतात आणि रात्री पुरेशी झोप घेत नाहीत त्यांना सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
लठ्ठपणा
आजकाल लठ्ठपणाची समस्या देखील वाढत चालली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे. जर तुम्ही जास्त वेळ झोपलात किंवा अगदी कमी झोप घेतली तरी याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो आणि वजन झपाट्याने वाढते.
एका संधोधनानुसार जे लोक रोज रात्री ९ ते १० तासांची झोप घेतात त्यांचे वजन वाढते. या उलट जे लोक ६-७ तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचे वजन नियंत्रणात राहते.