गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत.
मुंबई : कोरोना महामारीनंतर आता चीनमधून पुन्हा एकदा गंभीर आजाराने तोंड वर काढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये लहान मुलांना श्वास घेण्यास यामुळे त्रास होतो. चीनमध्ये अशा रुग्णांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
भारतातही वॉकिंग न्युमोनियाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, हा चिनी न्यूमोनियाची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी नाकारली आहे. मात्र त्यांनी मुंबईकरांना सावध केले असून बदलत्या वातावरणामुळे आरोग्य बिघडू शकते असा अंदाज वर्तवला आहे.
चीनसारखा हा श्वसनाचा संसर्ग नाही
केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले की, दिल्लीच्या एम्समध्ये वॉकिंग न्युमोनियाचे सात रुग्ण सापडले आहेत. भारतात सापडणाऱ्या रुग्णांमध्ये वॉकिंग न्युमोनियाची साधी लक्षण आहेत, मात्र याचा चीनमध्ये असलेल्या श्वसन आजाराशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही तर प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे आरोग्य बिघडू लागल्याची माहिती तज्ञ देतात.
दर तीन ते सात वर्षांनी होते वाढ
जे जे रुग्णालयातील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार वॉकिंग न्युमोनिया ही कोणती मोठी गोष्ट नाही. अशा रुग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार होत असते. काही ठराविक काळानंतर तीन ते सात वर्षात या वॉकिंग न्युमोनियाची समस्या आढळून येते, मात्र वर्षात कोणत्याही वेळी हा न्युमोनिया आढळून येतो.
कोणाला होऊ शकतो वॉकिंग न्युमोनिया ?
वॉकिंग न्युमोनिया हा २ ते ६५ वर्षाच्या जेष्ठापर्यंत कोणालाही होऊ शकतो. यात तंबाखू चे सेवन, आणि श्वसन विकार असणाऱ्यांना या न्युमोनियाचा धोका अधिक आहे.
मुंबईत मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाने २ मुले ग्रस्त
मुंबईत मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया ची २ बालकांना लागण झाली आहे. या दोन्ही मुलांना वरळीच्या एसआरसीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान, मुलांना या जिवाणूंची लागण झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या मते, काळजी करण्यासारखे काही कारण नाही, वेळेवर उपचार आणि चांगली काळजी घेऊन मुले बरी होतात.
रुग्णालयाचे क्रिटिकल केअरचे तज्ज्ञ डॉ. सोनू उधानी यांनी सांगितले की, न्यूमोनिया झालेली मुले गंभीर आजारी पडू शकतात. वॉकिंग न्युमोनिया काही नसतो. मायको प्लाझ्मा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणाऱ्या न्यूमोनियामुळे रुग्ण आमच्याकडे येतात. त्याची लक्षणे इतर न्युमोनियासारखी असतात, ज्यात खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
रिकव्हरी साठी ४-५ दिवस –
मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाने ग्रस्त मुले ४ ते ५ दिवसात बरी होतात. सावधगिरी म्हणून, आम्ही जवळजवळ प्रत्येकाला दाखल करतो. जर एखाद्याला सौम्य लक्षणे असतील तरच त्याला घरी उपचार सुरू ठेवण्यास सांगितले जाते.
स्वच्छता महत्वाची
डॉक्टरांच्या मते, हा संसर्ग खोकल्यामुळे आणि शिंकण्याने पसरतो. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.