क्लिष्ट येणी वसूल होतील
मेष : गुरू-शुक्राचा शुभयोग सप्ताहात भाग्यसंकेत देणाराच. सप्ताहाची सुरवात अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोगाची, गाठीभेटींना वेग येईल. नोकरीत मानांकन मिळेल. सप्ताहाचा शेवट भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक गाठीभेटी करवणारा. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. क्लिष्ट व्यावसायिक येणी वसूल होतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता मिळेल.
वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील
वृषभ : सप्ताहाची सुरवात घरातील विशिष्ट सुवार्तांतून धन्य करेल. घरातील तरुणांचे भागोदय होतील. रेंगाळलेले वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राचा शुभयोग व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनं यामध्ये यशस्वी करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह वादग्रस्त व्यावसायिक येणी वसूल करून देईल. ता. ३१ जानेवारीची पंचमी गाठीभेटीतून उत्तम सूर लावून देईल.
चौकार-षटकार माराल
मिथुन : गुरू-शुक्राचा शुभयोग सप्ताहावर मोठा अंमल करेल. सप्ताह गाठीभेटी, मुलाखती, करारमदार व नोकरीतील अफलातून भागोदयातून बोलणारा. सप्ताहाची सुरवात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विजयी चौकार-षटकारांतून बोलेल. प्रेमिकांची स्वप्नं साकारतील. पुनर्वसु नक्षत्राच्या तरुणांचा परदेशी भाग्योदय होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार विचित्र गुप्तचिंतेचा. नुकसानीचं भय.
नोकरीत वरिष्ठांशी वाद नकोत
कर्क : सप्ताह हर्षलच्या विविष्ट स्थितीतून सार्वजनिक बाबींमध्ये जपण्याचा कोणताही जुगार नको. नोकरीत वरिष्ठांशी वाद नकोत. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात व्यावसायिक तेजीचीच राहील. घरातील मानसिक पर्यावरण सुवार्तांतून छानच राहील. शुक्रवारची कालाष्टमी आपल्या राशीस दैवी प्रचितीची.
मोठी व्यावसायिक झेप घ्याल
सिंह : सप्ताहातील गुरू-शुक्राचा शुभयोग मोठा नावीन्यपूर्ण फळे देईल. तरुणांच्या चांगल्या नोकरीविषयक मुलाखती होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती थोरामोठ्यांच्या ओळखीचा लाभ उठवेल. सप्ताहाची सुरवात मोठी गतिमानच राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठी भाग्यलक्षणं दाखवेल. व्यावसायिक मोठी झेप घ्याल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र दुखापतीचा.
आर्थिक कोंडी दूर होईल
कन्या : गुरू-शुक्राचा शुभयोग आर्थिक कोंडी घालवेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना कर्ज मंजुरीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संसर्गजन्य बाधा सतावू शकते. प्रवासात जपा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विचित्र वादाचा केंद्रबिंदू बनवू शकतो. वैवाहिक जीवनातील भावसंबंध जपा. शनिवारी संध्याकाळी वाहनं सांभाळा. खरेदीत जपा. शेजाऱ्यांशी गैरसमज टाळा.
जुनाट व्याधींचा त्रास शक्य
तूळ : गुरू-शुक्राचा शुभयोग मोठ्या कनेक्टिव्हिटीचा. विवाहप्रकरणं मार्गी लागतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रचंड ऊर्जा मिळणार आहे. सप्ताहाची सुरवात विजयी चौकार-षटकारांची राहील. नोकरीत भाग्यलक्षणं दिसतील. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार अनेक प्रकारातून बेरंगाचा ठरू शकतो. समारंभात जपा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना जुनाट व्याधीतून त्रास शक्य.
सरकारी कामं फत्ते होतील
वृश्चिक : सप्ताहातील शुक्रभ्रमण चांगलाच प्रभाव टाकेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळीकडून लाभ. उद्याची संकष्टी चतुर्थी सरकारी कामं फत्ते करून देणारी. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ होईल. परदेशस्थ तरुणांचे व्हिसाविषयक प्रश्न सुटतील. ओळखीतून विवाहस्थळं येतील. विवाहातील अडथळे जातील.
परदेशात भाग्य उजळेल
धनु : राशींच्या एक्सचेंजमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वाढेल. विवाहेच्छुंनो, सप्ताहात ऑनलाइन राहाच. सप्ताहात मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सेलेब्रिटी बनणार आहेत. मोठा झगमगाट करणार आहात. आजचा रविवार मोठी भाग्यबीजं पेरणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना राशीतील बुध चांगलीच कनेक्टिव्हिटी साधून देईल. सप्ताहाची सुरवात परदेशी भाग्यबीजे पेरणारी.
शैक्षणिक क्षेत्रातल्या चिंता संपतील
मकर : सप्ताह विशिष्ट उत्सव समारंभ घडवेल. कलाकारांचा भागोदय होईल. तरुणांची विशिष्ट शैक्षणिक चिंता जाईल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तीकडून लाभ होतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या वेगवान घडामोडींचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार भाग्याचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार घरात अशांततेचा.
विवाहाचा बलवत्तर योग
कुंभ : सप्ताहात शुभग्रहांचंच फिल्ड राहील. सप्ताहात उमलेल्या तरुणाईला मोठा वाव मिळणार आहे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सुवार्तांच्या मोठ्या फ्रेश न्यूज देणारा. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती मोठे विजयी चौकार-षटकार मारतील. विवाहाचा बलवत्तर योग आहे. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींशी थट्टामस्करी टाळावी. मुख्यतः शनिवारी पथ्यं पाळावी, आहारविहारदी सुद्धा.
अफलातून लाभ मिळतील
मीन : गुरू-शुक्राच्या शुभयोगाची मोठी पर्वणी सप्ताहात राहील. सप्ताहाचा आरंभ अणि शेवट काही परिस्थितीजन्य असे अफलातून लाभ देईल. ता. ३० ते १ हे दिवस प्रत्येक वन डे जिंकून देतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या राजकीय पुढाऱ्याकडून लाभ होतील. मात्र शनिवारी वैवाहिक जीवनात जपा.