राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२४)

नोकरी-व्यवसायात भाग्योदय

मेष : मकर संक्रमणाचा सप्ताह एकूण आपल्या राशीस शुभलक्षण दाखवेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक भाग्योदयातून निश्‍चितच बोलेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रव्यथा जाईल. ता. १५ ते १७ हे दिवस मोठी मजेदार फळे देतील. भरणी नक्षत्राची व्यक्ती सुवार्तातून चर्चेत राहील.

आदर-सत्कार होईल

वृषभ : मकर संक्रमाचा सप्ताह रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून शुभलक्षणी, ता. १६ ते १८ हे दिवस रंगसंगतीनं साजरे कराल. घरात लक्षात राहणारे सोहोळे होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा आदरसत्कार होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना चैन व करमणुकीचे योग आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती अनुभव येईल.

थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील

मिथुन : मकर संक्रमणाजवळ घरी वा दारी वाद व गैरसमज टाळा. अन्नपाण्यातील संसर्ग जपा. बाकी आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १८ व १९ हे दिवस वैयक्तिक उपक्रमाने गाजवतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना संक्रांत थोरामोठ्यांच्या गाठीभेटीची. विशिष्ट व्यावसायिक वसुली होईल. शुक्रवार नोकरीविषयक मुलाखतींचा असेल.

गुप्त चिंता जातील, आनंदाचा काळ

कर्क : मकरसंक्रांतीचा सप्ताह काहींना दैवी प्रचिती देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस घरात आनंदोत्सवाचे. विशिष्ट गुप्त चिंता जाईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर ता. १८ चा गुरुवार मोठी गुरुकृपा करेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना देवदर्शनाचा योग.

विजयपथावर आगेकूच कायम

सिंह : सप्ताह मकर संक्रमणाचा खरा अर्थ सांगणारा. सध्याचा आपल्या राशीच्या भाग्यातील गुरू आपली चांगलीच विचारजागृती करत आहे. अशा या ज्ञान दृष्टीतून विशिष्ट कार्यभाग साधणार आहात. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ते २० हे दिवस एकप्रकारचा विजयपथ ठेवतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना लक्ष्मीचा प्रसाद मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.

कलावंतांसाठी चांगला कालखंड

कन्या : सप्ताहाच्या आरंभी सर्वच बाबतीत आचारसंहिता पाळावी. मकर संक्रांतीजवळ कुपथ्यं नकोत. घरातील द्वाड मुलांना जपा. बाकी शुक्र भ्रमणाची स्पंदनं ता. १७ व १८ या दिवसांत छान राहतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती त्यांचा उत्तम लाभ घेतील. कलावंतांचा भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सुवार्ता. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता.

संस्मरणीय घटना घडतील

तूळ : मकर संक्रमण चांगल्या अर्थानं संक्रमित करणारं ठरणार आहे. कलाकारांमध्ये जान येईल. नोकरीतल्या घडामोडी प्रसन्न करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांची धावपट्टी प्रचंड अनुकूल राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा गुरुवार अतिशय संस्मरणीय असाच ठरेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रांत धनयोगाची.

नैतिक विजय मिळेल

वृश्‍चिक : ग्रहांची धावपट्टी मकर संक्रांतीजवळ मोठी धावसंख्या रचून देईल. व्यावसायिक कामांचा ओघ राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर लक्ष्मी प्रसन्न राहील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रांतीजवळ एखादा नैतिक विजय मिळेल. सरकारी माध्यमांतून कामं होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय.

नावीन्यपूर्ण फळं मिळतील

धनु : मकर संक्रमणाजवळची ग्रहस्थिती मोठी गतिमान राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना आत्मप्रचिती देणारे ग्रहमान. ता. १८ ते १९ हे दिवस मोठी नावीन्यपूर्ण फळे देतील. नोकरीत- व्यवसायात स्थैर्य लाभेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या तरुणांना या सप्ताहातील ग्रहाची धावपट्टी विजयी चौकार-षटकार मारण्यास प्रवृत्त करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मकर संक्रांत भावसमृद्ध करेल.

महत्त्वाची कामं होतील

मकर : मकर संक्रांतीचा सप्ताह विशिष्ट बोध देणाराच ठरेल. प्रसिद्धीचा हव्यास टाळा. राजकीय व्यक्तींशी संपर्क नको. बाकी ता. १६ ते १८ हे दिवस किंवा ही ग्रहांची धावपट्टी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना छान धावा काढून देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची महत्त्वाची कामं होतील. घरातील तरुणांचा भाग्योदय. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनयोग आहे.

कष्टाचं चीज व स्पर्धात्मक यश

कुंभ : सप्ताहातील मकर संक्रमण जनसंपर्कातून जपण्याचं. आजचा रविवार सार्वजनिक जीवनातून सांभाळण्याचा. बाकी ग्रहांची धावपट्टी बुद्धिजीवी मंडळींना चांगलीच. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ ते १९ हे दिवस मोठे आनंदाचे राहतील. कष्टाचं चीज होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं स्पर्धात्मक यश मिळेल.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील

मीन : सप्ताहाची सुरवात विशिष्ट गुप्त चिंतेची राहील. मात्र ता. १७ ते १९ हे दिवस चिंताहरण करणारेच. ता. १८ चा गुरुवार रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा प्रसन्न ठेवेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांची कृपा प्राप्त होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार संस्मरणीय गाठीभेटीचा. घरातील तरुणांचा भाग्योदय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *