आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी…
आकाशगंगेतील पहिली महत्त्वाची रास म्हणजे मेष. घाईगडबड, गोंधळ, लहरीपणा, उत्साह, आनंदी वृत्ती, अति उष्णता यांचा संगम म्हणजे ही मेष रास होय. आश्विनी नक्षत्राचे दिव्यत्व व आनंद, भरणी नक्षत्राची धनसमृद्धी, कृत्तिका नक्षत्राचा मानीपणा आणि आकर्षकपणा घेऊन ही रास आलेली आहे.
राशिचक्राची सुरुवातच या राशीने होते, यावरून या राशीचे महत्त्व समजून येईल. या वर्षी धनस्थानी असलेल्या गुरूमुळे वर्षभर सतत धनलाभ होत राहतील. सतत कुठून तरी पैसा मिळत राहील. कर्ज असेल, तर ते फेडले जाईल. डोळ्यांचे विकार असतील तर ते कमी होतील. आरोग्यही उत्तम राहील. कुटुंबात मंगलकार्य होण्याचे योग आहेत.
जानेवारी : चंद्रगुरू गजकेसरी योगाचा लाभ मिळेल. राहूच्या कचाट्यातून गुरू मुक्त झाल्यामुळे गेल्या वर्षभरात झालेला सर्व त्रास भरून निघेल. आर्थिक अडचणी कमी होतील. या राशीच्या लोकांच्या मनामधील सर्व इच्छा आपोआप पूर्ण होण्यासाठी अनुकूल कालावधी.
फेब्रुवारी : लाभातील रवी, बुध, शनीचा काही बाबतीत चांगला परिणाम दिसून येईल. फुटणे-तुटणे, नोकरी सुटणे वगैरे प्रकार घडले तरी त्यातून पुढे काहीतरी चांगले होणार आहे, याचे हे लक्षण आहे. कारण लाभातील ग्रह कधीही वाईट फळ देत नाहीत. मंगळ-शुक्र युतीमुळे कामाच्या ठिकाणी नवनवीन योजना आखून सर्वांचे मन जिंकाल. त्यामुळे तुम्हाला पुन्हा नवीन ऑर्डरी मिळू शकतील.
मार्च : आनंदभाग्य आणि संपत्ती मिळवून देणारे ग्रहमान आहे. पूर्वी जर कुठे पैसे इत्यादी आले असतील अथवा गुंतवणूक केली असेल, तर या महिन्यात त्याचा लाभ होऊ शकतो. रक्तपात, तंटे, कलह यांपासून दूर राहा. काही कारणाने अशा प्रसंगाशी गाठ पडू शकते. त्यामुळे सावध राहणे योग्य समजावे.
एप्रिल : वक्री बुधाचे प्रमाण काही महत्त्वाचे निर्णय उलटसुलट करण्याची शक्यता आहे. व्यवहारी बुद्धीनेच सर्व कामे हाताळावी लागतील. नोकरी, उद्योग, व्यापार या बाबतीत कोणताही निर्णय जपून घ्यावा. मंगळ, राहू, बुध ही युती काही वेळा मानसिक गोंधळ निर्माण करेल; मात्र इतरांनी नाकारलेल्या काही संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
मे : रवी, गुरू, शुक्राचे सहकार्य आर्थिक बाबतीत उत्तम आहे. चंद्र, बुध, हर्षल योगावर तडकाफडकी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्याचा तुमच्या पुढील योजनांवर चांगला परिणाम होईल. लाभात शनीमुळे एखादे कायमस्वरूपी काम पूर्ण होईल. सरकारी कामाशी संबंध असेल, तर तुम्हाला जरा जपून वागावे लागेल. रवी दूषित आहे. घराण्यातील कुलाचार वगैरे चुकले असतील, तर त्याचा त्रास होऊ शकतो.
जून : चंद्र-मंगळाचा लक्ष्मी योग सुरू होत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारून जाईल. नवनवीन कामे मिळतील. पूर्वी काही कारणाने आरोप आलेले असतील, तर ते नाहीसे होतील. नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनातील वातावरण समाधानकारक राहील. गुरू-हर्षलच्या शुभ योगावर अचानक मोठ्या धनलाभाची शक्यता आहे. त्याची सुरुवात या महिन्यापासूनच होईल.
जुलै : मित्र अगर ओळखीच्या लोकांकडून काहीतरी घोटाळा होईल. आर्थिक बाबतीत महिना उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात बऱ्याच महत्त्वाच्या शुभ उलाढाली घडतील. कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. या महिन्यात जुन्या वस्तूंची खरेदी शक्यतो करू नका. नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड होईल.
ऑगस्ट : शुक्र-केतू युती चांगली नाही. कोणत्याही मोहात अडकणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमप्रकरणे वगैरे असतील, तर जपावे लागेल. सरकारी कामात उत्तम यश. मुलांच्या बाबतीत भाग्योदयाचा काळ. रवी-गुरूचा शुभयोग प्रलंबित कामकाजांना गती देईल. बुधाचे भ्रमण महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा, असे सुचवित आहे. आषाढी आमावस्येला दीपपूजन केल्यास नोकरीविषयक समस्या असतील, तर त्या दूर होतील.
सप्टेंबर : गणेश चतुर्थीदरम्यान अति उत्साहाला आवर घाला. कोणतेही महत्त्वाचे निर्णय जपूनच घ्या. उच्च शुक्राचे भ्रमण विवाहाच्या बाबतीत अनुकूल आहे. अपेक्षेपेक्षाही चांगलं स्थळ मिळेल. पितृपक्षात पूर्वजांचे काही दोष जाणवण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पितृसूक्त वाचावे. त्यामुळे बऱ्याच अडचणी कमी होतील.
ऑक्टोबर : आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ. अनेक महत्त्वाच्या कामांत यश मिळेल. कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील; पण तुमचे नियोजन मात्र चांगले हवे. काही बाबतीत व्यवहारी आणि स्पष्ट राहिल्यास पुढे होणाऱ्या काही अप्रिय घटना टळतील. रवीचा प्रकोप टाळण्यासाठी सूर्याची आराधना करावी.
नोव्हेंबर : शनि-मंगळाचे षडाष्टक सुरू आहे. वाहन जपून चालवावे. कोणाच्याही वादविवादात पडू नका. कोर्ट प्रकरणे असतील तर जपून हाताळावीत. रक्तदोष निर्माण होतील, असा आहार टाळावा लागेल. थोडी सावधानता बाळगल्यास हा महिना विशेष अनिष्ट नाही. दिवाळी दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे योग. विवाहाच्या दृष्टीने अनुकूल काळ. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. या वर्षीचे कार्तिक स्वामींचे दर्शन तुमच्या सर्व तऱ्हेच्या समस्या दूर करेल. तसेच व्यक्तिमत्त्वाचा फायदा करून देईल.
डिसेंबर : या महिन्यातील चंद्राची स्थिती व त्याचे अनुभव पुढीलप्रमाणे येतील. ६, ७, ८ तारखांना मानसिक संभ्रम राहील. १२, १३ रोजी प्रेम व मनोरंजन यासाठी खर्च होईल. १६ व १७ रोजी आजारपण असेल. चिंता, भय, भांडणतंटे, कलह यांपासून दूर राहणे चांगले. १८, १९, २० कुणाची दुःखे, संकटे सोडविण्याच्या भरीस पडू नका.
कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात मेष राशीतील आश्विन नक्षत्र रविवारी असताना केल्यास त्यात चांगले यश मिळते. वैभव, लक्ष्मी, वैद्यकशास्त्र, ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच वाहन चालविण्यात या लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही. कोणत्याही कामाचे प्लॅनिंग करावे ते याच लोकांनी; पण सर्व काही उत्तम असूनही केवळ चंचलपणामुळे ही माणसे मागे पडतात.
या वर्षी कुंभेतील शनी राशीच्या लाभस्थानी असल्याने तो सर्वप्रकारे शुभप्रदायक आहे. स्वतःची इस्टेट वगैरे होऊ शकेल. राजकारणात असाल तर उच्च पद मिळू शकेल. दीर्घस्वरूपी अनेक महत्त्वाची कामे होतील. राहूचे भ्रमण मात्र अचानक काही विचित्र प्रसंग निर्माण करेल. प्रत्येक कामात यश मिळेलच असे नाही. काही जणांना परदेश प्रवासाचे योग आहेत.
हर्षल संपूर्ण वर्षभर तुमच्या राशीतच आहे. जे काही निर्णय घ्याल, त्यात घाईगडबड करू नका; पण जीवनात अत्यंत महत्त्वाच्या घटना अथवा कलाटणी या हर्षलमुळे मिळेल. त्यामुळे तुम्ही सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करणे योग्य ठरते.