जॉब - एजुकेशन

राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

गारगोटी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) झालेल्या राज्यसेवा परीक्षेत (Civil Service Exam) भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil) राज्यात प्रथम आले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ते उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांना ६२२ गुण मिळाले आहेत.

त्यांच्या निवडीने मुदाळ (Mudal) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ते गावी आलेले आहेत. त्यांचे यश समजताच त्यांच्या घराकडे ग्रामस्थांची अभिनंदनासाठी रीघ लागली. त्यांच्या मित्रांनी त्यांना गुलालात न्हाऊ घातले. विनायक पाटील यांचे गावातील विद्यामंदिरामध्ये प्राथमिक शिक्षण झाले.

परशराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांना बारावी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले होते. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. याच जोरावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे बी. एस्सी. पदवीचे शिक्षण घेतले. या दरम्यान, त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी प्रथम विक्रीकर अधिकारी पदाची परीक्षा दिली. यात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.

यानंतर उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा दिली. यातही ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. ते सध्या उपशिक्षणाधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी २०२२ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यांच्या या यशाने आई-वडिलांसह गावकऱ्यांचा ऊर भरून आला आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. यावर मात करीत त्यांनी स्वतः च्या हिमतीवर लख्ख यश संपादन केले.

विनायकला शिक्षणाविषयी जिद्द होती. मोठा अधिकारी होणारच, असे त्याने मनाशी ठरविले होते. आम्ही त्याला काही कमी पडू दिले नाही. आमच्या कष्टाचे चीज झाले. मुलगा उपजिल्हाधिकारी झाला, याचा अभिमान आहे.

-नंदकुमार पाटील, विनायकचे वडील

घरच्या प्रतिकूल परिस्थितीने सतत जाणीव करून दिली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली. पुणे व कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विविध परीक्षा दिल्या. कोणत्याही क्लासेसला न जाता स्वयंअध्ययनावर भर दिला आणि त्याच जोरावर आजचे यश मिळाले.

-विनायक पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *