इस्लामपूर : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) यांनी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. लोकसेवा आयोगाच्या वतीने काल दुपारीच ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पूजा वंजारी यांचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
पूजा वंजारी या मूळच्या बोरगाव (ता. वाळवा) येथील आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील विद्यालयात झाले. त्यांचे वडील अरुण वंजारी हे शेती करतात, तर आई गृहिणी आहेत. २०१९ ला त्यांची सहायक निबंधक सहकारी संस्था अधिकारीपदी निवड झाली होती.
२०२२ मध्ये त्यांनी त्याचा पदभार स्वीकारला होता. सध्या त्या पुणे येथे साखर संकुल येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लहान बहीण प्राजक्ता हीसुद्धा मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहे, तर चुलत भाऊ रणजित वंजारी हे सहायक अभियंता सिंचन भवन पुणे येथे कार्यरत आहेत.
पूजा यांनी पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता. अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला; मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. सध्या शासकीय सेवेत असल्या तरी उपजिल्हाधिकारी होण्याचे ध्येय बाळगून त्या प्रयत्नशील होत्या. त्यांच्या निवडीबद्दल इस्लामपूर आणि बोरगाव येथे आनंद साजरा करण्यात आला.