Akola MIDC Development Work: औद्योगिक वसाहतीतील अकोला विकास केंद्र, वाहतूक नगर मधील टर्मिनलचे बांधकाम तसेच फेज १, २ व ३ मधील रस्त्यांच्या डांबरी करणाचे कामांसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ही विकास कामे लवकर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
अकोला येथील औद्योगिक विकास वसाहतीतील विकास कामे करण्याकरिता अकोला विकास केंद्र येथे ट्रक टर्मिनलचे बांधकाम करण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय अकोला विकास केंद्रातील वाहतूक नगर आणि एम लेआऊटमध्ये रस्त्यांसाठी डी.बी.एम. आणि बी.सी. थर टाकणे या कामासाठी १८ कोटी रुपये मंजूर केलेत.
अकोला औद्योगिक विकास क्षेत्रातील फेज क्रमांक एक, दोन व तीन मधील अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी २४ कोटी रुपय, अशी एकूण ५२ कोटी रुपयाची विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहे. या तिन्ही कामाच्या निविदा अंतिम असून, सदर निविदा मान्यतेसाठी व्यवस्थापकीय संचालक औद्योगिक विकास महामंडळ यांना सादर करण्यात आले आहेत.
सदर निविदा अंतिमत: मान्यतेनंतर या सगळ्या विकास कामांना तातडीने सुरुवात होणार आहे. सदर विकास कामांकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. आ.सावरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडे मागणी केली होती. याची दखल घेवून राज्यचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अकोला येथे औद्योगिक विकास महामंडळाने ९२२.२३ हेक्टरवर अकोला औद्योगीक क्षेत्र व अकोला विकास केंद्र विकसीत केले आहे.
वाहनाकरिता पार्कींगची वीधा
औद्योगिक क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रक सारख्या अवजड वाहनांचा वापर होतो. सदर वाहनाकरिता पार्कींगची सुविधा उपलब्ध होण्याचे दृष्टीने अकोला विकास केंद्रात ट्रक टर्मिनस विकसीत दृष्टीने विशेष निधी दिला आहे. त्या अनुषंगाने म.औ.वि. महामंडळाने सदर ट्रक टर्मिनसमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा पूरविण्याकरीता १० कोटी १२ लाख ४५ हजार १८५ रुपये विशेष निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आलेली आहे.
अपघात टाळण्यासाठी प्रयत्न
अकोला जिल्हाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी उदयोजकांना मालवाहतुकीसाठी व कामगारांना येण्या-जाण्यासाठी उत्तम प्रतीचे व दर्जेदार रस्ते उपलब्ध करण्याकरिता शासन निधी मंजूर असून, सदरच्या निविदा अंतिम मान्यतेनंतर विकास कामांना सुरुवात होणार आहे. यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, अजितपवार, उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आभार मानलेत.