Asoda Railway Flyover : मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ- जळगाव या दोन महत्त्वाच्या जंक्शन स्थानकांदरम्यान आसोदा रेल्वेगेटवर ‘महारेल’कडून उड्डाणपुलाची निर्मिती होत असून या पुलाचे काम हाती घेतल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत पूर्णत्वाकडे आले आहे. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च पिंप्राळा उड्डाणपुलाच्या पाठोपाठ आता हा आसोदा रेल्वेपूलही लोकार्पणासाठी सज्ज होतोय.
आठवडापूर्वी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते दूरदृष्य प्रणालीने व स्थानिक मंत्र्यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
त्यापाठोपाठ आता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आसोदा रेल्वे गेटवर तयार होत असलेला उड्डाणपूल लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे.
असा आहे पूल
मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जळगाव- आसोदा मार्गावर या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. २०२२मध्ये पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली. जळगाव व आसोदा मार्गावर ७०० मीटर अंतर असलेल्या या पुलासोबत समांतर सेवारस्तेही तयार करण्यात येत आहे. ३३ कोटी रुपये खर्चून पुलाचे काम करण्यात येत असून आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ ते १५ टक्के काम बाकी असून ते दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा ‘महारेल’ने केला आहे.
रहदारीत केले काम पूर्ण
जळगाव – आसोदा मार्ग अविरत रहदारीचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुतर्फा जळगाव शहरात दाट लोकवस्ती वसलेली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत या पुलाचे काम हाती घेण्यात आले आणि अगदी दोनच वर्षांत ते पूर्ण करण्यात आले. ‘महारेल’ने प्रचंड वेगात हे काम पूर्ण केले आहे.
आधुनिक यंत्रणेद्वारे काम
आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणेद्वारे या पुलाचे काम करण्यात आले. ‘महारेल’ने क्रॅश बॅरियर या आधुनिक प्रणालीद्वारे पुलांचे काम सुरु केले आहे.
सुरक्षेची तडजोड न करता सुविधांची पूर्तता, तपासणी व दुरुस्तीचे काम, काही यंत्रसामग्री बदलण्याचे काम, उत्तम असेंब्ली या बाबींचा प्रणालीत समावेश आहे. स्टेनलेस स्टील (३ टीयर)च्या आधुनिक युनिलिटी डक्टसह एकत्रित याद्वारे करण्यात आले आहे.
अशा असतील सुविधा
– रात्रीच्या चांगल्या दृष्यमानतेसाठी व दूरस्थपणे नियंत्रित थीम- आधारित एलईडी
– सजावटीच्या कमानींसाठी उड्डाणपुलावर एलईडी पथदिव्यांची व्यवस्था
– पुलाच्या सजावटीसाठी ‘फोर कोटींग’ रंगकाम
– पुलाच्या दोन्ही बाजूंनी समर्पित सेवारस्त्यांची सुविधा
– वेग कमी न करता रेल्वेची मुक्त वाहतूक शक्य
– रेल्वे फाटकमुक्तीच्या दिशेने आणखी एक टप्पा, गर्दीमुक्त वाहतूक
– या पुलाच्या कामामुळे जळगाव- आसोदा- भादली रस्त्यावरील वाहनधारकांची होणार सुविधा
– या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने रस्तेवाहतूक करणाऱ्यांचा वेळ पुलामुळे वाचणार आहे.