पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान या उद्घाटनावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार-खासदारांना ऐनवेळी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांची नावे नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या वतीने निमंत्रण येऊन सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार खासदार आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे.
दरम्यान मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील.अटल सेतूच्या उद्घाटनानंतर दुपारी ते मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन विकासकामांचे उद्घाटन करतील. नवी मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
तसेच ईस्टर्न फ्री वे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची ते पायाभरणी देखील केली जाणार आहे. तसेच सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा मोदी राष्ट्राला समर्पित करतील. उरण खारकोपर रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा सुरू होईल. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आणि खार रोड गोरेगाव दरम्यान च्या सहाव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले जाईल.