यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था, खुर्च्या तुटल्या, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड
बीड : जिल्ह्यातील सर्वांत पहिले व सर्वांत मोठे असा एकेकाळी लौकिक असलेल्या येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्यांची मोडतोड, वातानुकूलित यंत्रणेचा बिघाड, स्वच्छतागृहाची मोडतोड झाल्याने कलावंत, नाट्यप्रेमींची कुचंबणा होत असल्याचा आरोप नाट्यप्रेमींनी केला. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे प्रशासन जाणीवपूर्णक कानाडोळा करत असल्याचा आरोप करत नाट्यप्रेमींनी मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना भरमसाट भाडे आकारणी, साउंड व्यवस्थेत भ्रष्टाचार, लाइनमन असलेल्या व्यक्तीला व्यवस्थापक नेमणे यामुळे नाट्यगृहाचे गोदाम झाल्याचा आदी आरोप करत नाट्यगृह बचाव कृती समितीने पेटी, ढोलकीच्या तालावर गाणे म्हणत आंदोलन केले. उपविभागीय अधिकारी करिश्मा नायर यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
आंदोलनात नाटककार व कलावंत डॉ. सतीश साळुंखे, डॉ. सुधीर निकम, लक्ष्मीकांत दोडके, प्रतीक कांबळे, कैलास शिंदे, गौतम खटोड, मुकुंद धुताडमल, रविराज जेधे, डॉ. उज्ज्वला वणवे, एजाज अली, विनोद दळवी, डॉ. वारे, सुरेश साळुंके, केशव भागवत, किशोर धुताडमल, देवा दहे, बाळू निसर्गंध आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, डॉ. योगेश क्षीरसागर, नगरसेवक वाघचोरे, युवसेना अध्यक्ष अजय सुरवसे यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला. या आंदोलनादरम्यान किशोर धुताडमल व त्यांचे बंधू यांनी लोकगीत गायन, वादन करून सर्वांचे लक्ष वेधले. नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मोहीम प्रशासनाने तत्काळ हाती न घेतल्यास आम्ही सर्व कलावंत मिळून उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
सध्या नाट्यगृहात मोडलेला रंगमंच आणि फाटलेला मुख्य पडदा व विंगा पहायला मिळतात. याबरोबरच तुटक्या खुर्च्या, बंद पडलेल्या लाइट्स, बंद वातानुकूलित यंत्रणा व अचानक बंद पडणारी साउंड सिस्टम, तुटलेले सोफे, घाणेरडे स्वच्छतागृह आणि आवारात झाडांभोवती पडझड झालेली आहे.
अग्निशमन व्यवस्था, पेयजल व्यवस्था, ग्रीन रूम व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. तसेच नाटकासाठी आवश्यक नाट्यगृहातील ऑडियन्स लाइट व चेअर लाइट्स पूर्णतः बंद आहेत. हिंसक आंदोलनादरम्यान नाट्यगृहाबाहेरील शोभेचे आकर्षण असणाऱ्या काचादेखील मोठ्या फुटलेल्या आहेत. नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबरोबर नाट्यगृहाच्या तिकीट विक्री रूममध्ये आणि पार्किंग विभागामध्ये रस्त्यावरील लाइट्स पोलच्या भंगार साहित्यासाठी गोडाऊन बनवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.