राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटनेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर दळवी यांना शुक्रवारी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी विक्रोळीत दळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे.
‘टायगर इज बॅक’
माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. काल दळवी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या विक्रोळी विभागात शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर टायगर इज बॅक असा उल्लेख आहे.
सोमवारी भांडुप येथे ठाकरे गटाचे कोकणी कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाषणादरम्यान दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या भाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दळवी यांना बुधवारी अटकही करण्यात आली. त्यानंतर दळवी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.