मुंबई– सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ईडी, सीबीआयला आम्ही सहकार्य केलं आहे. पण, काहीजण सुडाचं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हातोडा घेऊन गेलेल्यांचा काय झालं, असे अनेक प्रश्न करत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी ज्या शहरात असतात त्याठिकाणी लोकांचे खून होतात. संपूर्ण देशात सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांनी एकतर गृहमंत्रीपद ठेवावं किंवा उपमुख्यमंत्रीपद ठेवावं. एकातरी पदाला न्याय द्यावा अन्यथा त्यांनी गृहमंत्रीदाचा राजीनामा देऊन टाकावा, असं पवार म्हणाले.
ईडीच्या अधिकाऱ्यांवर आमचा आक्षेप नाही. त्यांनी मागितली ती आम्ही मदत करत आहोत. सर्व कागदपत्रं आम्ही दिले आहेत. भाजपला मला एकच विचारायचं आहे. तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते त्यांचं काय झालं. मी राजकारणात येण्याआधी व्यवसायात होतो. पण, जे राजकारणात येऊन मोठे व्यावसायिक झाले. त्याचं काय? लोकांना सर्व दिसत आहे, असं ते म्हणाले.
ज्या दिवसांपासून भाजप सरकार सत्तेत आलंय. तेव्हापासून आतापर्यंत चार ते पाच पोलिसांना भाजप आमदारांकडून मारहाण झाली आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. पण, आता नवीन प्रथा सुरु झाली आहे. कांबळे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. अजित दादा त्यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. मग, दादा गप्प का राहिले, असा सवाल रोहित पवारांनी केला.
सगळी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. खरी चूक असती तर देशात परत आलो नसतो. सर्व कागदपत्रं दिली आहेत. पण, भाजप यामध्ये राजकारण करत आहे? खरी चूक केली असती तर दादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो. जे आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे, असा सवाल त्यांनी केलाय.