राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.
आजच्या सामना मधील आग्रलेखात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर डॉक्टरेट पदवीचा संदर्भ देत निशाणा साधण्यात आला आहे. या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
सामनाच्या आग्रलेखात काय म्हटलंय?
“राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याही अश्रूंनी भिजल्या आहेत. एका यवतमाळ जिल्हय़ातच 48 तासांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.असे निर्घृण राज्य करणारे लोक श्रीराम मंदिर सोहळ्याच्या राजकीय घंटानाद करीत फिरत आहेत.
महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करीत आहेत व बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जपानमधील एका विद्यापीठाने सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ही ‘डॉक्टरेट’ दिल्याचे समजते. राज्यात सामाजिक समतेचे व पुरोगामी विचाराचे वाभाडे निघाले आहेत. सध्या मराठा, ओबीसी व इतर समाजातील भांडणे विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामागे कोणाचे डोके व खोके आहेत ते महाराष्ट्र जाणतो.
आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ‘डॉ.’ अशी उपाधी लागेल. मुख्यमंत्री मिंधे यांनाही मधल्या काळात कुणा संस्थेने सामाजिक कार्याबद्दल ‘डॉ.’ पदवी दिली. पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधले ‘डॉ.’ बोलत नाहीत.”
शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, भाजप नेते आशिष शेलार यांनी नावापुढे ‘डॉ’ लागण्यासाठी फक्त अग्रलेख लिहून भागत नाही अशा खोचक शब्दात संजय राऊतांना सुनावलं आहे. शेलार म्हणाले आहेत की, “रोज सकाळी टिव्हीवर फालतू बडबड करुन अथवा मराठी माणसाच्या घरांचे कटकमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही. नतद्रष्टासारखे “हग्रलेख” लिहून तर नाहीच नाही.. नावापुढे “डॉ” लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी गरीबांची सेवा, प्रचंड मेहनत, कष्ट, धाडस, धडाडी, निष्ठा, त्याग आणि संघर्ष करावा लागतो…! “डॉक्टर” या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार श्रीमान संजयबाबू!”