GST Return: जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे
GST Return: केंद्र सरकारकडून छोट्या व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केली आहे आणि त्यांना जीएसटीआर-9 भरण्यापासून सूट दिली आहे.
हा फॉर्म 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यावसायिकांना भरावा लागतो. यामध्ये त्यांना वार्षिक विवरणपत्र भरायचे असते. आता हा फॉर्म भरण्यापासून छोट्या व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे.
ट्विट करून दिली माहिती
अर्थ मंत्रालयाने आपल्या X हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 5 वर्षांत जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 65 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल 2023 पर्यंत जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 1.13 कोटी झाली. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या आता 1.40 कोटींवर पोहोचली आहे, जी एप्रिल 2018 मध्ये केवळ 1.06 कोटी होती.
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जीएसटी नियम आणि कार्यपद्धती तयार केल्यामुळे लोकांमध्ये रिटर्न भरण्याचा उत्साह वाढला आहे. चालू आर्थिक वर्षात, 90 टक्के पात्र करदात्यांनी महिन्याच्या अखेरीस GSTR-3B रिटर्न भरले आहेत. 2017-18 मध्ये जीएसटी लागू होण्यापूर्वी हा आकडा केवळ 68 टक्के होता.
जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे
1 जुलै 2017 रोजी GST लागू करण्यात आला. त्यात उत्पादन शुल्क, सेवा कर आणि व्हॅट यांसारख्या डझनहून अधिक स्थानिक करांचा समावेश होता. एप्रिल 2018 मध्ये GSTR-3B फाइल करणाऱ्यांची संख्या 72.49 लाखांवरून एप्रिल 2023 पर्यंत 1.13 कोटी झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षातील ही सहावी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.