आज (30 डिसेंबर) जालना-मुंबई वंदे भारत एक्स्र्प्रेसला हिरवा कंदिल मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचं उद्घाटन करतील. विशेष म्हणजे या वंदे भारत एक्स्प्रेसचं सारथ्य मराठवाड्याचीच एक लेक करणार आहे.
कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट असणार आहे. हा नक्कीच खूप अभिमानास्पद अनुभव असल्याचं मत कल्पनाने व्यक्त केलं. “वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सहाय्यक चालक म्हणून जबाबदारी मिळणं हे अभिमानास्पद आहे. मराठवाड्यासाठी ही रेल्वे महत्वाची आहे. या रेल्वेमध्ये कित्येक नवीन फीचर्स आहेत.” असं ती म्हणाली.
अवघ्या 27 वर्षांची कल्पना ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाल गावची रहिवासी आहे. कल्पनाचे वडिल मदनसिंग धनावत हे एसटी महामंडळात नोकरीला होते. कल्पनाने 2016 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर 2019 साली कल्पना रेल्वे विभागात लोको पायलट पदावर रुजू झाली.
गुरुवारी जालना ते मनमाडपर्यंत वंदे भारत रेल्वेची टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी देखील कल्पनाने सहाय्यक लोको पायलट म्हणून काम पाहिलं होतं. यानंतर आज उद्घाटनावेळी देखील लोको पायलट म्हणून तिचीच निवड करण्यात आली आहे.