मुंबई: ‘‘एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार हे निश्चित होते. त्यावेळी मी स्वतः अजित पवार यांना म्हटले होते, की मी आता विरोधी पक्षनेता होतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. त्या वेळी त्यांनी नकार देत मला विरोधी पक्षनेता व्हायचे आहे, असे सांगितले.
मला त्या वेळी विरोधी पक्षनेता व्हायची इच्छा होती. मात्र, अजित पवार यांनी त्या पदावर दावा केल्यानंतर मी माघार घेतल्याने ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कथित वादावर तसेच नाराजीनाट्यावर भाष्य केले.
ते म्हणाले, की अजित पवार यांची विरोधी पक्षनेता होण्याची मागणी आम्ही सर्वांनी मान्य केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे म्हणणे कधी डावलले नाही. अजित पवार यांनी आग्रह केल्यानंतर मी सुद्धा माघार घेतली. त्यावेळी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, मी आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. भुजबळ यांनी मला सांगितले, की तुम्ही पक्षाचे काम बघा आणि अजित पवार यांना सरकारचे काम बघू द्या. एवढा आमच्यात एवढा समजूतदारपणा होता.
मागणी करणे गुन्हा असेल, तर मी दोषी आहे. त्यावेळी माझी ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तरीदेखील मी पक्षाचे काम सुरुच ठेवले. त्यामुळे आमच्यात मतभेद कधी झालेच नाहीत. त्यांना जे पाहिजे होते, ते शरद पवार यांनी दिले, असे मला वाटते. ते चार वेळा उपमुख्यमंत्री झाले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मी ज्या पक्षात आहे, तो पक्ष वाढविण्यासाठी जे करावे लागेल, ते आम्हाला पूर्ण ताकदीने करायलाच हवे. पक्षवाढीसाठी जे अडथळे असतील त्याच्याविरोधात आम्हाला लढावेच लागणार आहे. त्याला काही इलाज नाही. आता जे काही होईल ते होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
व्यक्तिगत संबंध चांगले; अलीकडे भेट नाही!
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की माझे आणि अजित पवार यांचे व्यक्तिगत संबंध फार चांगले आहेत. आता अलीकडे भेटच होत नाही. त्यामुळे संबंध कसे आहेत, हे तपासता येत नाही. आता आमचे मार्ग बदलले आहेत. फारकत झाली आहे. जो रोल नशिबात असेल, तो आम्हाला ‘प्ले’ करावाच लागेल. राज्यातील जनता महत्त्वाची आहे. तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊन काही करणे, हे बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा असतो.